
वाडी मालदेतील कमी दाबाच्या वीज समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा
नवीन ११ केव्ही वाहिनी व ६३ केव्हीए रोहित्राचे काम पूर्ण; जलजीवन मिशनच्या नळपाणी योजनेलाही मिळणार चालना
खेड : तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नांदिवली अंतर्गत वाडी मालदे येथे मागील अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. DPDC अंतर्गत नवीन ११ केव्ही विद्युत वाहिनी आणि ६३ केव्हीए DTC विद्युत रोहित्र उभारणीचे काम पूर्ण झाले असून, ग्रामस्थांच्या उपस्थितीत या विद्युत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री तथा पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम तसेच गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनामुळे व शिफारशीमुळे या कामाला गती मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
वाडी मालदे गावचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष शांताराम चव्हाण यांनी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी या समस्येबाबत अर्ज करून पाठपुरावा सुरू केला होता. त्यानंतर मंत्रालयातील नियोजन विभाग, मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जा राज्यमंत्री, गृहराज्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आला.
अखेर ९ मार्च २०२६ रोजी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाली. या प्रकल्पासाठी २१ लाख ५९ हजार ७०२ रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यानंतर ४ जून २०२६ रोजी कामाची ऑर्डर देण्यात आली, तर ५ जूनपासून M/s Kranti Electricals & Co. यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
प्रकल्पांतर्गत ३७ नवीन विद्युत पोल, ६३ केव्हीए विद्युत रोहित्र, चैनल, अँगल तसेच आवश्यक विद्युत उपकरणांची उभारणी करण्यात आली. गणपती बाप्पाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला १३ सप्टेंबर रोजी नवीन ११ केव्ही लाइन आणि ६३ केव्हीए DTC प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले.
वाडी मालदे येथील जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी योजना मागील दोन वर्षांपासून कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे बंद होती. नवीन विद्युत व्यवस्था कार्यान्वित झाल्यामुळे या योजनेस आवश्यक वीजपुरवठा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, नळपाणी योजना पुन्हा सुरळीत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवीन विद्युत प्रकल्पामुळे शेती, नवीन घरबांधणी, रोजगाराच्या संधी, धार्मिक व सामाजिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आवश्यक वीजपुरवठा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे. वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणीही कमी होण्यास मदत होणार आहे.
वाडी मालदेतील वीजप्रश्नावर अडीच वर्षे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर प्रकल्प पूर्ण झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. हा प्रकल्प केवळ वीजपुरवठा सुधारण्यापुरता मर्यादित नसून गावाच्या विकासाला चालना देणारा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
या कामासाठी सहकार्य, पाठिंबा आणि विश्वास दिल्याबद्दल वाडी मालदे ग्रामस्थ मंडळ तसेच मुंबई व पुणे ग्रामस्थ मंडळाचे संतोष चव्हाण यांनी आभार मानले.




