
मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांनी खासदार नारायण राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांची घेतली भेट महाराष्ट्रातील मच्छीमारांना डिझेल दरात सवलतीसाठी केंद्राकडे पाठपुरावा
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या डिझेल दरातील सवलतीच्या मागणीसाठी केंद्र सरकारकडे निर्णायक पाठपुरावा सुरू झाला आहे. राज्याचे मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांनी खासदार नारायण राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांची नवी दिल्लीतील कर्तव्य भवन येथे भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील यांत्रिक मासेमारी नौका तसेच मच्छीमार सहकारी संस्थांना प्रचलित किरकोळ दराने डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या भेटीत कोकणासह राज्यातील विविध मच्छीमार संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. डिझेलच्या वाढत्या दराचा थेट परिणाम मासेमारीच्या फेऱ्या, मासळीची आवक आणि मच्छीमारांच्या उत्पन्नावर होत असल्याचे शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
इंधन खर्च वाढल्यामुळे सागरी मत्स्यव्यवसायाची आर्थिक व्यवहार्यता अडचणीत आली असून, मच्छीमारांना डिझेल दरात योग्य ती सवलत देण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
डिझेल दरात सवलत मिळाल्यास राज्यातील हजारो मच्छीमारांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मासेमारीचा खर्च कमी झाल्यास नियमित मासेमारी फेऱ्या वाढण्यास, मासळीची आवक सुधारण्यास तसेच मच्छीमारांच्या उत्पन्नाला हातभार लागण्यास मदत होईल. त्यामुळे सागरी मत्स्यव्यवसाय अधिक सक्षम आणि शाश्वत करण्यासाठी ही मागणी महत्त्वाची मानली जात आहे.
या बैठकीला महाराष्ट्र राज्य मच्छीमार संस्था संघाच्या अध्यक्षा ज्योती राजेश मेहेर, सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार संस्था फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद गणपत धुरी, रत्नागिरी जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष हरेश्वर हरिश्चंद्र कालेकर, देवगड यांत्रिक नौका मालक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सूर्यकांत खवळे, देवगड फिशरमेन्स सोसायटीचे तज्ञ संचालक सचिन दत्ताराम कदम, मुंबई जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास पांडुरंग संघ, रायगड जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचे अध्यक्ष प्रल्हाद दिनेश पाटील तसेच देवगडचे नगरसेवक व मच्छीमार निवृत्ती रविंद्र तारी उपस्थित होते.
मच्छीमारांच्या डिझेल सवलतीच्या मागणीवर केंद्रीय पातळीवर झालेल्या या चर्चेमुळे या प्रश्नाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, केंद्र सरकारच्या निर्णयाकडे महाराष्ट्रातील मच्छीमारांचे लक्ष लागले आहे.




