भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत उदय सामंतांची एन्ट्री; राजकीय चर्चांना उधाण, पण कारण निघाले वेगळे!


पुणे : भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला राज्यातील भाजपचे दिग्गज नेते उपस्थित असताना शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे अचानक हजेरी लावली. सामंत यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र त्यांच्या या उपस्थितीमागे भाजपच्या बैठकीपेक्षा मराठा आरक्षणाचा मुद्दा असल्याचे स्पष्ट झाले.

भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार, पंकजा मुंडे, जयकुमार गोरे, नितेश राणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

याचदरम्यान दुपारी सुमारे पावणे चार वाजता उद्योगमंत्री उदय सामंत बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. शिवसेनेचे नेते असलेले सामंत भाजपच्या कार्यकारिणी बैठकीच्या ठिकाणी आल्याने उपस्थितांमध्येही त्यांच्या भेटीबाबत उत्सुकता निर्माण झाली.

दरम्यान, जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे. जरांगे पाटील यांची भेट घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी सामंत पुण्यात आल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून कोणता तोडगा काढता येऊ शकतो, तसेच जरांगे पाटील यांच्याशी होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पुढील भूमिका काय असावी, याबाबत सामंत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे सांगितले जात आहे.

त्यामुळे भाजपच्या कार्यकारिणी बैठकीत उदय सामंतांची उपस्थिती हा राजकीय संदेश आहे का? या चर्चेला सुरुवात झाली असली तरी, त्यामागे सध्या तरी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे कारण असल्याचे समोर आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button