‘निकम साहेब, विरेश्वर-रामतीर्थ दोन्ही तलाव मंजूर करून पाहायला येतो!’

मंत्री पंकजा मुंडे यांचे आमदार शेखर निकम यांना आश्वासन; तलाव संवर्धन व सुशोभीकरणासाठी निधी मंजुरीचा मार्ग मोकळा

चिपळूण : चिपळूण शहरातील ऐतिहासिक विरेश्वर आणि रामतीर्थ या दोन्ही तलावांच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी लवकरच निधी मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार शेखर गोविंदराव निकम यांना दिले. “निकम साहेब, विरेश्वर आणि रामतीर्थ हे दोन्ही तलाव मंजूर करून पाहायला येतो,” असे आश्वासन मुंडे यांनी दिल्याने तलाव संवर्धनाच्या विषयाला नवी गती मिळण्याची शक्यता आहे.

विरेश्वर तलावाच्या संवर्धनासाठी राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत १ कोटी ५१ लाख ६५ हजार ६६४ रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. संबंधित समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यताही मिळाली आहे. मात्र, अंतिम प्रशासकीय मान्यता आणि निधी मंजुरीचा शासन निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन विरेश्वर तसेच रामतीर्थ तलावांच्या संवर्धन व सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. शासनाकडे सादर असलेल्या प्रस्तावाची माहिती देत दोन्ही तलावांच्या विकासासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती त्यांनी केली.

यावेळी विरेश्वर आणि रामतीर्थ तलावांच्या विकासासाठी स्वर्गीय अजितदादांची तसेच मुख्यमंत्री महोदयांची शिफारस असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले. दोन्ही तलावांच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मंजुरी आणि निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

चिपळूणच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळखीशी जोडलेल्या या दोन्ही तलावांचे संवर्धन झाल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच नागरिकांसाठी आकर्षक सार्वजनिक ठिकाणे विकसित होण्यास मदत होणार आहे. तलाव परिसराचे सुशोभीकरण आणि पर्यावरणपूरक विकास झाल्यास चिपळूणच्या पर्यटन क्षमतेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

मंत्री पंकजा मुंडे यांच्या आश्वासनामुळे विरेश्वर आणि रामतीर्थ तलावांच्या संवर्धनासाठी प्रशासकीय मंजुरीचा मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. आता निधी मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची प्रतीक्षा चिपळूणवासीयांना आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button