
देवरुख ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या कक्षातील लाद्या कोसळल्या
कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या देवरुख ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पुरुष रुग्ण कक्षात भिंतीला लावलेल्या लाद्या पडू लागल्या आहेत. रुग्ण झोपेत असताना अचानक लादी कोसळून दुखापत झाल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातो आहे.
दीड वर्षापूर्वी या इमारतीचे उदघाटन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले. याठिकाणी अनेक पदे रिक्त असून सोयीसुविधांची वानवा आहे. उदघाटनापूर्वीच या इमारतीला घरघर लागली आहे.
उदघाटनापूर्वी भिंतीला लावलेल्या लाद्या कोसळू लागल्या आहेत. लाद्या कोसळल्या त्यावेळी रुग्ण नसल्याने अनर्थ टळला. यावरून काम दर्जाहीन झाल्याचे स्पष्ट होत आहे. उपचारासाठी रुग्णांना या कक्षात दाखल केले जाते. रुग्णाच्या खाटा भिंतीला लागून आहेत. रात्री अपरात्री झोपेत अचानक लादी कोसळून रुग्ण जखमी होऊ शकतात अशी स्थिती आहे. रुग्णांना भेडसावणाच्या समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे मात्र दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.



