
सायबर संस्कार स्वीकारू, सुरक्षित डिजिटल भारत घडवू
जीजीपीएसच्या विद्यार्थ्यांचा निर्धार : डॉ. अक्षय फाटक यांनी केले मार्गदर्शन
रत्नागिरी : जीजीपीएस स्कूलमध्ये डॉ. अक्षय फाटक आणि कीर्तनसंध्या ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर संस्कार – सुरक्षित, सजग आणि जबाबदार डिजिटल जीवन या विषयावर मार्गदर्शनपर सेमिनार उत्साहात झाला. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत “सायबर संस्कार स्वीकारू, सुरक्षित डिजिटल भारत घडवू” असा निर्धार व्यक्त केला.
आजच्या वेगवान डिजिटल युगात विद्यार्थ्यांनी केवळ मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर शिकून चालणार नाही, तर त्यासोबत सायबर संस्कार अंगीकारणेही तितकेच आवश्यक आहे, असा प्रभावी संदेश यावेळी देण्यात आला. सोशल मीडियाचे असंख्य फायदे असले तरी त्याचा अयोग्य वापर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, व्यक्तिमत्त्वावर आणि भविष्यावर विपरीत परिणाम करू शकतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने डिजिटल माध्यमांचा विवेकपूर्ण, सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.
सेमिनारमध्ये मोबाईल वापरताना घ्यावयाची काळजी, अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संवाद साधताना आवश्यक असलेली सावधगिरी, सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ किंवा कोणतीही माहिती पोस्ट करण्यापूर्वी त्याचे परिणाम समजून घेण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अफवा, खोटी माहिती, सायबर फसवणूक आणि ऑनलाइन गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
सायबर संस्कार म्हणजे डिजिटल जगात शिस्त, संयम, प्रामाणिकपणा, गोपनीयतेचा आदर, इतरांविषयी संवेदनशीलता आणि जबाबदारीची भावना जपत तंत्रज्ञानाचा सकारात्मक उपयोग करणे होय. या संस्कारातूनच उद्याचे सक्षम, चारित्र्यसंपन्न आणि राष्ट्रहिताची जाणीव असलेले सुजाण नागरिक घडतील, यावर विशेष भर देण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांना पालकांनी मोबाईल, कपडे, स्टेशनरी व इतर सुविधा प्रेम, विश्वास आणि शिक्षणाच्या उद्देशाने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे त्या सुविधांचा योग्य, मर्यादित आणि जबाबदारीने वापर करणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे कर्तव्य असल्याचेही सांगण्यात आले.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन यांचे आभार व्यक्त करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.




