गणेशोत्सवापूर्वी आंबा घाट वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता


आमदार किरण सामंतांसह रत्नागिरी-कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी; दिवसा वाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव


रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंड परिसरात रस्त्याला भेगा पडून संरक्षक भिंत कोसळल्याने बंद करण्यात आलेली वाहतूक गणेशोत्सवापूर्वी सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किरण ऊर्फ भैय्या सामंत यांच्यासह रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच बांधकाम सभापती विलास चाळके यांनी आंबा घाटाची प्रत्यक्ष पाहणी केली.

आंबा घाट हा रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून, या मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी, व्यापारी आणि मालवाहतूक होते. ओझरे खिंड येथे रस्त्याला भेगा पडल्याने तसेच संरक्षक भिंत कोसळल्याने अवजड वाहतूक आणि एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहनधारक, प्रवासी, व्यापारी आणि मालवाहतूकदारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून आर्थिक नुकसानही होत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात मोठ्या प्रमाणात प्रवासी दाखल होणार असल्याने आंबा घाट वाहतुकीसाठी सुरू करणे गरजेचे असल्याचे आमदार किरण सामंत यांनी पाहणीदरम्यान सांगितले. घाटातील परिस्थिती लक्षात घेऊन दिवसा सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक सुरू ठेवावी आणि रात्रीच्या वेळेत अवजड वाहतूक बंद ठेवावी, असा प्रस्ताव चर्चेत आला.

मात्र, आंबा घाट वाहतुकीसाठी नेमका कधी आणि कोणत्या अटींवर खुला करायचा, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ, वाहतूक विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या अहवालानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

पाहणी दौऱ्यावेळी आमदार किरण सामंत, बांधकाम सभापती विलास चाळके, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तहसीलदार, आरटीओ अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button