
रत्नागिरीत ‘श्री राधाकृष्ण करंडक २०२६’ स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
रत्नागिरी : श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्था यांच्यावतीने गोपाळकृष्ण अष्टमी उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मॅटवरील नाईट कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दिमाखदार पद्धतीने पार पडला. सोमवारी सायंकाळी शहर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्याहस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेच्यावतीने आणि रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ‘श्री राधाकृष्ण करंडक २०२६’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शहर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांच्यासह शेखर म्हाप,आर्मी मधील विजय आंबेरकर ,भैय्या वणजू तसेच राधाकृष्ण मंदिराचे विश्वस्त वसंत भिंगार्डे, आबा देवळेकर, अध्यक्ष राजन मलुष्टे, संस्थेचे उपाध्यक्ष विरेंद्र वणजू, नीलेश मलुष्टे, राजेश रेडीज, नगरसेवक केतन शेट्ये, सिद्धार्थ बेंडके, स्पर्धा प्रमुख वेदांग मलुष्टे, युवराज शेट्ये, अभिज्ञ वणजू आणि ईतर मान्यवर उपस्थित होते. १९ ऑगस्टपर्यंत या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मॅटवर रंगणाऱ्या या स्पर्धेत तालुक्यातील विविध नामांकित संघांचा सहभाग आहे. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाला असून 19 ऑगस्ट पर्यंत मॅट वरील स्पर्धेचा थरार पाहण्याची संधी रत्नागिरीवासियांना मिळणार आहे.




