कै. मृणाल हेगशेट्ये वक्तृत्व स्पर्धेत शिवम जाधवची बाजी;सावित्रीच्या लेकी राधा, संस्कृती, ग्रीष्माने गाजवले व्यासपीठ

नवनिर्माण व एसकेएसव्ही कॉलेजने पटकावले सांघिक चषक

रत्नागिरी : कै. मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत यंदा महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या युवा वक्त्यांनी आपल्या प्रभावी आणि अभ्यासपूर्ण वक्तृत्वाची छाप पाडली. राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गटात शिवम जाधव याने प्रथम क्रमांक पटकावत मानाचा किताब मिळवला. जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन गटात राधा समीर पाटणकर, माध्यमिक मराठी गटात संस्कृती शांताराम कोकरे, तर इंग्रजी माध्यम गटात ग्रीष्मा अजित नोंदोस्कर यांनी प्रथम क्रमांक पटकावून आपापल्या गटात अव्वल स्थान मिळवले. तब्बल १५६ विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे शनिवारी, दि. २९ ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेला वक्तृत्वाचा जणू उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. कनिष्ठ महाविद्यालयीन गटाचा सांघिक चषक नवनिर्माण महाविद्यालयाने, तर वरिष्ठ महाविद्यालयीन गटाचा सांघिक चषक एसकेएसव्ही कॉलेज, लांजा यांनी पटकावला.

महाराष्ट्रातील मानाची व अग्रगण्य अशी कै. मृणाल हेगशेट्ये स्मृती राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा यावर्षी शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्स्फूर्त वातावरणात पार पडली. तब्बल १५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत वक्तृत्वाचा जणू उत्सवच साजरा केला. जिल्हास्तरीय माध्यमिक गटातील मराठी व इंग्रजी माध्यम, जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन गट आणि राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गट अशा चार गटांत ही स्पर्धा घेण्यात आली.

कै. मृणाल हेगशेट्ये स्मृती वक्तृत्व स्पर्धेला तब्बल चार दशकांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. ज्वलंत व निर्भीड विषय, पारदर्शक निकाल आणि राज्यभरातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे या स्पर्धेने महाराष्ट्रात आपला वेगळा नावलौकिक निर्माण केला आहे. यंदा पुणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, सांगली, संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

स्पर्धेचे खास आकर्षण ठरले ती उत्स्फूर्त स्पर्धा.कनिष्ठ आणि वरिष्ठ गटातील अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या स्पर्धकांचे यात कसोटी लागली. अगदी टी ट्वेंटी क्रिकेट मधील उत्कंठावर्धकता आणि थ्रील पहावयास मिळाले. आलेल्या चिट्टीतील विषयावर आयत्यावेळी सादरीकरण करताना विद्यार्थ्यांनी चारोळ्या, कविता, किस्से यांची बरसात केली. हजरजबाबीपणा, विनोदी बुद्धी यांचा मिलाफ करत विद्यार्थ्यांनी अप्रतिम विषयाची मांडणी केली. वक्तृत्वाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विचार मांडण्याचे आणि आपल्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या स्पर्धेने यंदाही विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीला आणि प्रभावी वक्तृत्वाला दाद दिली. चार दशकांची परंपरा लाभलेल्या या स्पर्धेने पुन्हा एकदा शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख अधोरेखित केली.

स्पर्धेतील विजेते याप्रमाणे –

जिल्हास्तरीय माध्यमिक मराठी गटात नवनिर्माण हायची संस्कृती शांताराम कोकरे हिने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. फाटक हायस्कूलची तपस्या गुरुप्रसाद बोरकर हिने द्वितीय, तर केंद्रीय नवोदय विद्यालय, पडवे येथील आर्या उदय यादव हिने तृतीय क्रमांक मिळवला. डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलची देवता प्रमोद पाटील हिला उत्तेजनार्थ प्रथम, तर मीनाताई ठाकरे हायस्कूल, साडवलीची पंकजा उत्रेश्वर गीते हिला उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळाला.

इंग्रजी माध्यम माध्यमिक गटात एसव्हीआयसीटी इंग्लिश मीडियम स्कूल, कासारवाडीची ग्रीष्मा अजित नोंदोस्कर हिने प्रथम क्रमांक पटकावला. नवनिर्माण हाय, रत्नागिरीची आफ्रा मुदस्सर डिंगणकर द्वितीय, तर संतोष भाई मेहता स्कूल, दापोलीची जान्हवी काशीराम देवघरे तृतीय ठरली. नवनिर्माण हायची तीर्था संदिप नाखरेकर आणि संतोष भाई मेहता स्कूल, दापोलीची रिद्धी दत्ताराम चौगले यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवले.

जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन गटात अभ्यंकर-कुलकर्णी कॉलेज, रत्नागिरीची राधा समीर पाटणकर हिने प्रथम क्रमांक मिळवला. नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरीची विधी सत्यजित कापडी द्वितीय, तर अण्णासाहेब बेहरे कॉलेज, लवेल-खेडचा नीरज प्रफुल तलाठी तृतीय ठरला. वी. स. गांगण ज्युनिअर कॉलेज, रत्नागिरीची बिलवा गणेश रानडे आणि ज्ञानदीप कॉलेज, बोरज-खेडची श्रेया कृष्णा मेस्त्री यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवले. या गटाचा सांघिक चषक नवनिर्माण महाविद्यालयाने पटकावला.

राज्यस्तरीय वरिष्ठ महाविद्यालयीन गटात शिवम संदीप जाधव (पुणे विद्यापीठ) , याने प्रथम क्रमांक मिळवला. अनिकेत रामा वनारे (जेधे महाविद्यालय पुणे) याने द्वितीय, तर अभय कृषिकांत आळशे (मुंबई विद्यापीठ) याने तृतीय क्रमांक पटकावला. भगवंत रामचंद्र कोळी (कला वाणिज्य महाविद्यालय वारजे, माळवाडी, पुणे)आणि एसकेएसव्ही कॉलेज, लांजाचा अथर्व विवेक पाध्ये यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवले. या गटाचा सांघिक चषक एसकेएसव्ही कॉलेज, लांजा यांनी पटकावला.

स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार तथा राजापूरच्या नगराध्यक्षा हुस्नबानू खलिपे यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण आयबीएन चॅनलचे संपादक मंदार फणसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, संचालक डॉ. अलिमिया परकार, संचालिका सीमा हेगशेट्ये, संचालिका ऋतुजा हेगशेट्ये, प्राचार्य संजय गवाळे, आर्किटेक्ट संतोष तावडे, फणसकिंग मिथलेश देसाई, स्पर्धा संयोजक सचिन टेकाळे, परीक्षक डॉ. केदार काळवणे, डॉ सदानंद आग्रे, संदीप कांबळे, ईश्वरचंद्र हलगरे, बाणे, चैतन्य कांबळे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button