‘कोकणाच्या मातीत खाण प्रकल्प नको!’ :नाणार–कुंभवडे–सागवेतील बॉक्साईट उत्खननाला ब्रेक; जनसुनावणीच रद्द

पालकमंत्री उदय सामंतांची स्पष्ट ग्वाही; ‘स्थानिकांच्या मनात जे आहे, तेच होईल, निश्चिंत रहा’ — आमदार किरण सामंतही जनतेसोबत

📍राजापूर : प्रतिनिधी

राजापूर तालुक्यातील नाणार, कुंभवडे आणि सागवे परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साईट खनिज उत्खनन प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थ, मच्छीमार, शेतकरी तसेच विविध राजकीय पक्षांकडून होत असलेल्या तीव्र विरोधाला मोठे बळ मिळाले आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने ७ सप्टेंबर रोजी प्रस्तावित करण्यात आलेली जनसुनावणी रद्द करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी केली.
‘स्थानिक जनतेच्या मनात जे आहे, तसेच होईल. तुम्ही निश्चिंत रहा. भविष्यात कोकणात पर्यावरणपूरक उद्योगच येतील,’ अशी स्पष्ट ग्वाही ना. उदय सामंत यांनी सागवे येथे झालेल्या सर्वपक्षीय प्रकल्पविरोधी संघर्ष मेळाव्यात दिली.

नाणार, कुंभवडे आणि सागवे परिसरात प्रस्तावित बॉक्साईट खनिज उत्खनन प्रकल्पामुळे पर्यावरण, शेती, जलस्रोत, मच्छीमारी आणि स्थानिकांच्या जीवनमानावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून ७ सप्टेंबर रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, प्रकल्पाला स्थानिकांचा असलेला तीव्र विरोध लक्षात घेता ही जनसुनावणी होणार नसल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी रविवारी सागवे येथे सर्वपक्षीय प्रकल्पविरोधी संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. नारायण गणेश कुलकर्णी विद्यानिकेतन सागवे हायस्कूल येथे झालेल्या या मेळाव्यास पालकमंत्री उदय सामंत, राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत पदाधिकारी, सरपंच, ग्रामस्थ, मच्छीमार व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मेळाव्यात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकजूट दाखवत प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाला तीव्र विरोध केला. ‘आमच्या जमिनी, आमची शेती, आमचे समुद्र आणि आमचे पर्यावरण वाचले पाहिजे,’ अशी भूमिका स्थानिकांनी मांडली. प्रकल्पामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय आणि सामाजिक समस्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

👉🏻‘स्थानिकांच्या मनात आहे तेच होईल; निश्चिंत रहा’

यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी स्थानिकांच्या भावनांचा आदर करण्याची शासनाची भूमिका स्पष्ट केली. कोकण हा निसर्गसंपन्न प्रदेश असून येथील पर्यावरण आणि स्थानिकांचे हित जपणे महत्त्वाचे आहे. स्थानिक जनतेला नको असलेला निर्णय त्यांच्यावर लादला जाणार नाही, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.

‘स्थानिक जनतेच्या मनात जे आहे, तसेच होईल. तुम्ही निश्चिंत रहा. भविष्यात कोकणात पर्यावरणपूरकच उद्योग येतील,’ असे सांगत त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिलासा दिला.

👉🏻आमदार किरण सामंत : ‘प्रकल्पाला आमचाही विरोधच’

आमदार किरण सामंत यांनीही या प्रकल्पाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना आपण कायमच मतदारसंघातील जनतेसोबत असल्याचे सांगितले. ‘प्रकल्पाला आमचाही विरोधच आहे. आपण स्थानिक जनतेसोबत आहोत; मात्र थोडी सबुरीही ठेवणे आवश्यक आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

‘मला कोणतेही राजकारण करणे आवडत नाही. माझी भूमिका नेहमीच रोखठोक असते. त्यामुळे या विषयावर कोणी राजकारण करत असेल तर त्याला बळी पडू नका,’ असे आवाहनही त्यांनी केले.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांना सागवे येथे आणले आहे, ते केवळ आपल्या जनतेसाठीच, असेही आ. किरण सामंत यांनी स्पष्ट केले.

👉🏻‘प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ लागतो’

‘कोणतेही काम असो, त्याची पूर्तता होण्यासाठी काही वेळ लागतो. कुणी आले आणि लगेच सर्व कागदपत्रांची झेरॉक्स काढल्यासारखे काम होत नाही. त्यासाठी थोडा धीर धरावा लागतो. आपल्या संघर्षाला आणि या संघर्ष मेळाव्याला निश्चितच यश मिळेल. काही गोष्टी टप्प्याटप्प्याने कराव्या लागतात,’ असे आ. सामंत यांनी सांगितले.

पालकमंत्री स्थानिक जनतेच्या मागणीचा नक्कीच विचार करतील आणि जनतेला अपेक्षित असाच निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या संघर्ष मेळाव्यामुळे नाणार, कुंभवडे आणि सागवे परिसरातील बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाविरोधातील स्थानिकांची भूमिका अधिक ठाम झाली असून, शासनाच्या भूमिकेकडे आता पंचक्रोशीतील जनतेचे लक्ष लागले आहे. जनसुनावणी रद्द करण्याच्या पालकमंत्र्यांच्या घोषणेमुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button