
नेपाळच्या महाप्रलयानंतर दापोलीची कन्या बेपत्ता; २५ ऑगस्टपासून संपर्क तुटला
अनघा अण्णादेवरे व पती व्यंकटराम यांचा शोध सुरू; दापोलीकरांकडून सुखरूप परतण्यासाठी प्रार्थना
दापोली, : नेपाळमध्ये झालेल्या महाभयंकर नैसर्गिक आपत्तीनंतर दापोलीची मुळची कन्या अनघा अण्णादेवरे (४९) आणि त्यांचे पती व्यंकटराम अण्णादेवरे (५२) यांचा २५ ऑगस्टपासून संपर्क तुटल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह दापोलीकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दोघेही बंगळुरूचे रहिवासी असून, नेपाळ भ्रमंतीसाठी गेले होते.
अनघा अण्णादेवरे या दापोलीतील वराडकर महाविद्यालयाच्या माजी प्राध्यापिका संजीवनी डेक्कनवार यांच्या कन्या आहेत. त्यामुळे या घटनेची माहिती समोर आल्यानंतर डेक्कनवार मॅडमचे माजी विद्यार्थी, मित्रपरिवार आणि दापोलीकरांकडूनही त्यांच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळ-तिबेट सीमेवरील रसुवा कस्टम्स कार्यालय हे त्यांचे शेवटचे ज्ञात ठिकाण असल्याचे दिसून येत आहे. २५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास (IST) तिबेटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांचा शेवटचा संपर्क झाल्याची माहिती आहे. त्यानंतर नेपाळमध्ये आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
महाप्रलयानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत अनघा आणि व्यंकटराम सध्या नेमके कुठे आहेत, ते सुरक्षित आहेत का, याबाबत कुटुंबीयांना कोणतीही ठोस माहिती मिळालेली नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे.
दोघेही सुखरूप असतील आणि लवकरच आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात येतील, असा आशावाद व्यक्त केला जात असून, दापोलीकरांकडूनही त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली जात आहे.



