
सिंधुदुर्गात पत्रादेवी चेक नाक्यावर ४०० बॉक्स गोवा दारूसह ट्रक जप्त
गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीविरोधात पेडणे अबकारी विभागाने मोठी कारवाई केली आहे. पत्रादेवी येथील गोवा-महाराष्ट्र सीमेवरील चेकनाक्यावर ट्रक अडवून त्यातून मॅकडॉवेल दारूचे सुमारे ४०० बॉक्स जप्त करण्यात आले.बाजारभावानुसार या दारूची किंमत सुमारे २० लाख रु., एवढी आहे. कांद्याच्या पिशव्यांच्या आडून दारूची वाहतूक केली जात असल्याचे या कारवाईत उघड झाले. दरम्यान, ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.
महाराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकबाबत अबकारी अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानुसार पत्रादेवी चेकनाक्यावर ट्रक अडवून त्याची तपासणी करण्यात आली. ट्रकच्या पुढील भागात कांद्याच्या पिशव्या आढळून आल्या. मात्र, मागील भागात मोठ्या प्रमाणात दारूचे बॉक्स आढळून आले. अबकारी अधिकाऱ्यांनी ट्रकसह दारूसाठा जप्त केला. जप्त केलेल्या साठ्यामध्ये प्रत्येक बॉक्समध्ये मॅकडॉवेल ब्रँडच्या १८० एमएल क्षमतेच्या प्रत्येकी ४८ बाटल्या आहेत, असे ४०० बॉक्स या ट्रकमध्ये सापडून आले.




