
औषध निरीक्षक भरतीचे पेपर फुटले, भरती प्रक्रिया रद्द; फेरपरीक्षा घेण्याचा आयोगाचा निर्णय!
मुंबई : राज्यात काही दिवसापूर्वी पेपर फुटी प्रकरणामुळे वादात सापडलेली अन्न औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. या परीक्षेत पेपर फुटी झाल्याच्या मुंबई पोलिसांच्या अहवालानंतर आयोगाने हा निर्णय घेतला असून आता या पदासाठी फेरपरीक्षा होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब या संवर्गासाठी आयोगाने २९ जुलै २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने चाळणी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल १२ जून २०२६ रोजी जाहीर करण्यात आला होता. चाळणी परीक्षेनंतर ५०६ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यापैकी ४८८ उमेदवारांच्या मुलाखती १ ते २२ जुलै २०२६ या कालावधीत घेण्यात आल्या. २२ जुलै रोजी मुलाखती पूर्ण झाल्यानंतर औषध निरीक्षक पदासाठी पात्र ठरलेल्या ४८५ आणि अपात्र ठरलेल्या तीन, अशा एकूण ४८८ उमेदवारांची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.
दरम्यान, २२ मार्च रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याबाबत २२ ते २६ जुलैदरम्यान आयोगाला काही उमेदवार तसेच लोकप्रतिनिधींकडून ई-मेलद्वारे तक्रारी प्राप्त झाल्या. परीक्षा सुरू होण्यापूर्वी, २० मार्च रोजी काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका अथवा प्रश्न मिळाले होते आणि ते सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित करण्यात आल्याचा दावा तक्रारींमध्ये करण्यात आला होता.
या तक्रारींचे गांभीर्य आणि प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन आयोगाने २७ जुलै रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे चौकशीसाठी तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हे अन्वेषण शाखेने प्राथमिक चौकशी करून आयोगाला अहवाल सादर केला. या अहवालानुसार, एका उमेदवाराला प्रश्नसंच मिळाल्याचे आणि त्याचा लाभ झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. आयोगाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षेची गोपनीयता, अखंडता, पारदर्शकता आणि निष्पक्षता कायम राखण्याबरोबरच उमेदवारांचा आयोगावरील विश्वास अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या पदांसाठी फेरपरीक्षा घेण्यात येणार असून संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. फेरपरीक्षेची तारीख व अन्य तपशील स्वतंत्र प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात येणार आहेत.




