
रखडलेली जलवाहिनी तात्काळ जोडा, पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश
रत्नागिरी शहराच्या पाण्याचा प्रश्न वेळत सुटावा आणि भविष्यातील जलसंकट टाळता यावे, यासाठी पानवल आणि शीळ धरण क्षेत्रातील पाणीसाठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुढील सहा महिने टिकेल या प्रशासकीय अहवालावर पूर्णपणे अवलंबून न राहता, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील संभाव्य बाष्पीभवनाचा आधीच हिशोब मांडून पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना त्वरित सुरू करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईची तीव्रता वाढू नये, यासाठी पानवल आणि शीळ धरणातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा दर लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पानवल धरणाची रखडलेल्या जलवाहिनी जोडणीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याचे सामंत यांनी सांगितले. प्रशासनाने आधीच सर्व संभाव्य घटकांचा विचार करून टंचाईवर मात करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.



