
उपोषण करूनही दाद नाही, लांजा येथील घनकचरा प्रकल्पाला विरोध, १५ ऑगस्टला कडक उपोषण
वस्तीलगत लादलेला घनकचरा (डम्पिंग ग्राउंड) प्रकल्प अन्य ठिकाणी करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी कोत्रेवाडी ग्रामस्थांच्यावतीने १५ ऑगस्ट रोजी लांजा तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडण्यात येणार असून याबाबतचे निवेदन मंगळवारी लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना सादर करण्यात आले. लांजा पोलीस ठाणे, लांजा नगरपंचायत यांनादेखील हे निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी मंगेश आंबेकर, सतीश पेडणेकर, संतोष कोत्रे उपस्थित होते.
गतवर्षी १४ ऑगस्ट २०२५ पासून सलग ९३ दिवस लांजा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण करूनदेखील अद्याप प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. प्रशासनाच्या गैर कारभाराविरोधात तसेच नियमबाह्य प्रस्ताव व खरेदीखत करणार्या नगरपंचायत लांजा मुख्याधिकारी आणि माजी नगराध्यक्ष यांची खातेनिहाय सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.




