
आंबोली धबधब्यावर सर्पदंशाने हम्पीच्या पर्यटकाचा मृत्यू; वाहतूक कोंडीमुळे उपचाराला विलंब
सावंतवाडी आंबोली येथील धबधब्यावर वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या हम्पी येथील पर्यटकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. गंगाधर मरप्पा (वय ३८) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हम्पी येथील काही पर्यटक वर्षा पर्यटनासाठी आंबोली धबधब्यावर आले होते. मुख्य धबधब्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर आंघोळ करत असताना गंगाधर मरप्पा यांना अचानक सापाने चावा घेतला. काही वेळातच त्यांची शुद्ध हरपली आणि त्यांच्या तोंडातून फेस येऊ लागला.
घटनेनंतर त्यांना तातडीने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र तेथे आवश्यक उपचारांची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, मुख्य धबधब्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी झाल्याने रुग्णवाहिकेला आंबोली घाटातून खाली येण्यासाठी तब्बल अडीच तास लागले. उपचारासाठी रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच गंगाधर मरप्पा यांचा वाटेत मृत्यू झाला.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार, चावा घेतलेला साप मण्यार किंवा नाग जातीचा असण्याची शक्यता आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेचा अधिक तपास सावंतवाडी पोलीस करत आहेत.




