️पायउतार केंद्रीय मंत्र्याचे विजयी योद्ध्यारखे स्वागत; धर्मेंद्र प्रधानांना जाहीर पाठिंबा देण्याची भाजपची रणनीती!

नवी दिल्ली : ‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी विद्यार्थी आंदोलकांच्या प्रचंड दबावामुळे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदाचा धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला असला तरी, सोमवारी संसदेमध्ये भाजपच्या खासदारांनी प्रधानांचे जणू एखाद्या विजयी योद्ध्यासारखे स्वागत केले! केंद्रीय मंत्र्याला पायउतार व्हावे लागले असले तरी, केंद्र सरकारचा हा पराभव न मानता प्रधानांना जाहीरपणे पाठिंबा देण्याची रणनीती भाजपने आखली आहे.

मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपचे नेते व खासदार धर्मेंद्र प्रधान सोमवारी पहिल्यांदाच संसदेमध्ये आले. संसदेच्या आवारात मकरद्वारासमोर विरोधी पक्षांचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. प्रधान दिसताच त्यांच्याविरोधात ‘इंडिया’ आघाडीच्या सदस्यांनी ‘मुर्दाबाद-मुर्दाबाद’च्या घोषणा दिल्या. त्याचा प्रतिवाद करत भाजपच्या खासदारांनी ‘धर्मेंद्र प्रधान जिंदाबाद-जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. प्रधानांचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर भाजपचे खासदार त्यांना घेऊन संसदेच्या आतमध्ये निघून गेले.

संसदेमध्ये प्रधान काही वेळ केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या दालनात बसले होते. त्यानंतर संसदेतून बाहेर पडत असताना त्यांची भेट काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार व पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्याशी झाली. रमेश यांनी प्रधानांशी हस्तांदोलन करून, ‘असे होत असते,’ असे म्हणत प्रधानांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. रमेश यांची टिप्पणी प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भात होती, त्यावर, ‘काहीही झालेले नाही. मी रस्त्यावर उतरून लढणारा कार्यकर्ता आहे. एसीमध्ये बसणारे सामाजिक कार्यकर्ता नव्हे,’ असे म्हणत प्रधान संसदेतून निघून गेले.

खासदारांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न

मोदी सरकारमधील वादग्रस्त केंद्रीयमंत्र्याला पायउतार व्हावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही केंद्र सरकारची हार मानली जात असली तरी, भाजपने मात्र या कथित ‘गैरप्रचारा’विरोधात आक्रमक होण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळेच संसदेमध्ये सोमवारी प्रधानांचे जंगी स्वागत केले गेले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सोमवारी संसदेच्या कॅन्टीनमध्ये भाजपच्या खासदारांबरोबर दुपारचे जेवण घेतले. भाजपच्या खासदारांमध्ये नकारात्मकता निर्माण होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची दुसरी ‘मंगल मीलन’ बैठक मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीमध्ये जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे केंद्राविरोधातील दबाव व वातावरण, विरोधकांचा आक्रमक प्रहार या सगळ्या अडचणींच्या मुद्द्यांवर मोदी सविस्तर भाष्य करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विद्यार्थी आंदोलनामुळे झालेल्या केंद्राच्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी ‘रालोआ’च्या खासदारांना आक्रमक होण्याच्या सूचना दिल्या जाण्याचीही शक्यता आहे.

प्रधान यांचे स्वागत हा युवकांचा अपमान

“धर्मेंद्र प्रधान यांचे विजयी स्वागत करण्याचा प्रकार अतिशय लज्जास्पद आणि देशातील तरुणांचा अपमान आहे,” अशी टीका काँग्रेसने केली आहे. प्रधान यांनी जणू काही फार मोठी कामगिरी केली आहे, अशा थाटात भाजप खासदारांनी त्यांचे स्वागत केले, असे जयराम रमेश यांनी ‘एक्स’वर लिहिले. आपल्या राजीनामापत्रामध्ये प्रश्नपत्रिका फुटीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी प्रधान यांनी विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला होता, अशी टीका रमेश यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button