स्मार्ट मीटरमुळे अतिरिक्त वीजबील का येतेय ? महावितरणने केला खुलासा

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीजबिल अचानक वाढल्याच्या तक्रारी राज्यभरातून होत असताना महावितरणने यामागील कारणांबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. स्मार्ट मीटरमध्ये कोणताही दोष नसून ते घरातील अगदी किरकोळ वीज वापर, लपलेली गळती, खराब अर्थिंग आणि जुन्या वायरिंगमुळे होणारा वीजप्रवाहही अचूक नोंदवतात.जुन्या मीटरमध्ये नोंद न होणारा हा वापर आता थेट बिलात दिसत असल्याने अनेक ग्राहकांना बिल वाढल्याचा भास होत असल्याचा दावा महावितरणने केला आहे.

स्मार्ट मीटरमुळे वीजबिल खरोखर वाढते का?

महावितरणच्या म्हणण्यानुसार स्मार्ट मीटर वीजबिल वाढवत नाही. ते फक्त प्रत्येक युनिटची अचूक नोंद करतात. जुन्या मीटरमध्ये नोंद न होणारा वीज वापरही आता नोंदवला जात असल्याने बिल वाढल्यासारखे वाटते.

कोणत्या कारणांमुळे स्मार्ट मीटर जास्त युनिट दाखवतो?

घरातील खराब अर्थिंग, वायरिंगमधील लपलेली गळती, दोषपूर्ण विद्युत जोडणी, स्टँडबाय मोडवरील उपकरणांचा वीज वापर आणि उन्हाळ्यात वाढलेला वापर यामुळे अधिक युनिट नोंदवले जातात.

उन्हाळ्याचा वीजबिलावर किती परिणाम होतो?

महावितरणच्या जनसंपर्क विभागाने सांगितले की, एसी, कूलर, पंखे, फ्रिज यांचा वापर वाढल्यामुळे उन्हाळ्यात वीज वापरात मोठी वाढ होते. हेही वाढीव बिलाचे प्रमुख कारण आहे.टीव्ही आणि एसी बंद असतानाही वीज वापर होतो का?

होय. रिमोटने बंद केलेले टीव्ही, एसी, सेट-टॉप बॉक्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे स्टँडबाय मोडमध्ये काही प्रमाणात वीज वापरत राहतात. स्मार्ट मीटर हा वापरही अचूक नोंदवतो.

स्मार्ट मीटर चुकीचे रीडिंग देत असल्याची शंका असल्यास काय करावे?

ग्राहकांनी घाबरून न जाता महावितरणच्या १९१२, १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवावी. तसेच जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन मीटर तपासणीची मागणी करता येते. निर्धारित शुल्क भरून अधिकृत मीटर अचूकता चाचणीही करता येते.

महावितरणने जुन्या आणि स्मार्ट मीटरची तुलना केली आहे का?

होय. काही ठिकाणी जुने आणि स्मार्ट मीटर एकाच ठिकाणी बसवून चाचणी करण्यात आली. या चाचणीत दोन्ही मीटरमधील वीज वापराची नोंद सारखीच असल्याचा दावा महावितरणने केला आहे.घरात वीजगळती आहे की नाही, हे कसे ओळखावे?

रात्री घरातील सर्व दिवे, पंखे आणि विद्युत उपकरणे पूर्णपणे बंद करा. त्यानंतर बाहेरील मीटर तपासा. सर्व उपकरणे बंद असतानाही मीटरवरील लाल दिवा सतत चमकत असेल किंवा मीटरमध्ये वीज वापराची नोंद होत असेल, तर घरातील वायरिंगमध्ये गळती असण्याची शक्यता आहे. अशावेळी तातडीने पात्र इलेक्ट्रिशियनकडून तपासणी करून घ्यावी.

वीजबिल कमी ठेवण्यासाठी महावितरणचा सल्ला काय?

घरातील अर्थिंगची तपासणी करून घ्या.
जुनी किंवा खराब वायरिंग तातडीने बदला.
वापर नसताना उपकरणांचा मुख्य स्विच बंद ठेवा.
महावितरणच्या अधिकृत ॲपद्वारे रोजचा वीज वापर तपासा.
शंका असल्यास मीटरची अधिकृत अचूकता चाचणी करून घ्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button