संगमेश्वर–देवरुख मार्गाची दुरवस्था; खड्ड्यांमुळे प्रवास संथ, वाहनचालक हैराण

संगमेश्वर : संगमेश्वर–देवरुख–साखरपा राज्य मार्गावरील संगमेश्वर ते देवरुख दरम्यानचा रस्ता पुन्हा एकदा खड्डेमय झाला असून वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पूर्वी अवघ्या अर्ध्या तासात पूर्ण होणारा प्रवास आता जवळपास तासभराचा होत असल्याची परिस्थिती आहे.

पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील खड्डे बुजवून तात्पुरती दुरुस्ती केली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे ती टिकू शकली नाही. रस्त्यावरील डांबरी थर उखडून खडी बाहेर आल्याने अनेक ठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत.

पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे. चारचाकी वाहनांनाही वारंवार वेग कमी करून प्रवास करावा लागत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहने धावत असल्याने अपघाताची शक्यता वाढल्याची भावना वाहनचालक व्यक्त करत आहेत.

रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दर्जेदार दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत आणि वाहतूक सुरक्षित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button