रायपाटण-पाचल मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू


राजापूर : रायपाटण-पाचल मार्गावरील हरळ परिसरात शनिवारी (४ जुलै) झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितेश चिमाजी साळवी हे त्यांच्या एमएच ०३ एक्स ६९७३ क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत असताना एमएच ४६ सीयू २११६ क्रमांकाच्या मच्छी वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत साळवी गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर रायपाटण येथील विनायक लिंगायत यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी स्वतःच्या वाहनातील चादरीच्या साहाय्याने जखमीला सुरक्षितपणे उचलून पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि कोणतीही विलंब न करता त्यांना रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही उपचारादरम्यान नितेश साळवी यांचे निधन झाले.

या अपघाताची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अपघाताचे नेमके कारण आणि पुढील तपास पोलीस करत आहेत. नितेश साळवी यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button