
रत्नागिरीत घरगुती एलपीजी पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध शिथिल करण्यासाठी आमदार प्रमोद जठार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
राजापूर : युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले तात्पुरते निर्बंध रत्नागिरी जिल्ह्यासाठी तातडीने शिथिल करून पुरवठा पूर्ववत करावा, तसेच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन घरगुती एलपीजी जोडण्यांना त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी दोन रिफिल सिलेंडरमधील किमान कालावधी ४५ दिवसांचा निश्चित करण्यात आला असून, नवीन घरगुती एलपीजी जोडण्यांवरही तात्पुरते निर्बंध लागू आहेत. या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आमदार जठार यांनी निवेदनात नमूद केले आहे.
रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने नागरिकांनी पारंपरिक लाकूड इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात कमी करून स्वयंपाकासाठी एलपीजीचा स्वीकार केला आहे. तसेच संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे अनेक घरांमध्ये सदस्यसंख्या अधिक असल्याने एका सिलेंडरवर ४५ दिवसांचा कालावधी पूर्ण करणे व्यवहार्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, कोकणातील होळी आणि विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, पुणे तसेच इतर शहरांत वास्तव्यास असलेले हजारो चाकरमानी गावी परत येतात. त्यामुळे घरगुती एलपीजीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. गणेशोत्सवाच्या काळात नवीन एलपीजी जोडण्या तसेच रिफिल सिलेंडरची गरजही लक्षणीय वाढत असल्याने विद्यमान निर्बंध शिथिल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण ग्राहकांसाठी दोन रिफिल सिलेंडरमधील ४५ दिवसांचा कालावधी तातडीने कमी करून पूर्ववत करावा किंवा किमान २५ दिवसांचा करावा. तसेच सर्व अधिकृत एलपीजी वितरकांना नवीन घरगुती एलपीजी जोडण्या देण्यास तत्काळ परवानगी द्यावी, अशी मागणीही आमदार जठार यांनी केली आहे.
याबाबत पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय तसेच संबंधित तेल विपणन कंपन्यांशी समन्वय साधून रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांना तातडीने दिलासा मिळेल, अशी आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.




