
‘देऊळबंद ३’चे ५० टक्के चित्रीकरण रत्नागिरीत करणार : प्रवीण तरडे
नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न....

रत्नागिरी : “देऊळ बंद ३” या चित्रपटाचे ५० टक्के चित्रीकरण हे रत्नागिरी येथे केले जाईल आणि चित्रपटांमध्ये उत्सवी नाट्य स्पर्धेत सहभाग घेतलेल्या कलाकारांना आणि रत्नागिरीतील स्थानिक रंगकर्मींना संधी दिली जाईल,” अशी ग्वाही मराठी चित्रपट क्षेत्रातील नामवंत अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते प्रवीण तरडे यांनी येथे दिली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी आयोजित नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मे २०२६ अशी तब्बल २४२ दिवस चाललेल्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ काल (५ जुलै) स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह येथे उत्साहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त. डॉ. उदय सामंत, रत्नागिरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, नगरसेविका मेधा कुलकर्णी यांच्या विशेष उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला भाटकर कुटुंबीयांच्या वतीने मरिनर दिलीप भाटकर उपस्थित होते.

स्पर्धेविषयी प्रास्ताविक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले. उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रवीण तरडे यांनी एका फोनवर येण्याचे कबूल केले आणि ते आले त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच भविष्यात रत्नागिरी मध्ये चित्रपट तयार करण्याचा विचार केल्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच स्पर्धेमधील ५७ नाटकांमधून निवडलेल्या ५७ लक्षवेधी अभिनेत्यांसाठी कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर यांचे शिबिर आयोजित करणार असल्याचे देखील जाहीर केले. स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त केलेल्या नाटकांचा सावरकर नाट्यगृहात महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे देखील जाहीर केले.
पालकमंत्री सामंत यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रवीण तरडे यांनी असे जाहीर केले. रत्नागिरीतील रंगकर्मींच्या पाठीशी रत्नागिरी नगरपालिका सदैव उभी राहील, अशी ग्वाही नगराध्यक्षा श्रीमती सुर्वे यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात कार्यकारिणी सदस्य मनोहर जोशी आणि श्वेता जोगळेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या नांदीने झाली. नटश्रेष्ठ रमेश भाटकर यांनी त्यांच्या आयुष्यातील नाटकांमध्ये जी पहिली भूमिका केली होती त्याविषयी त्यांनी त्यांच्या डायरीत नाटकात घडलेल्या गमतीजमती लिहिल्या होत्या. त्या उपस्थित प्रेक्षक आणि स्पर्धकांसमोर नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष ॲड. श्रीकांत भाटवडेकर यांनी खास शैलीत वाचून दाखवला. तसेच नट श्रेष्ठ रमेश भाटकर यांच्या पत्नी निवृत्त सरन्यायाधीश श्रीमती मृदुला भाटकर या त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बक्षीस समारंभाला उपस्थित राहू शकल्या नाहीत. पण त्यांनी स्पर्धकांसाठी आणि आयोजकांसाठी पाठवलेला उत्सवी नाट्य स्पर्धेबाबतचा निरोप व्हिडीओ क्लिपद्वारे नाट्यगृहात दाखवण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाट्य परिषदेचे कार्यवाह वामन कदम यांनी केले. त्यांना सूत्रसंचालनामध्ये ‘फू बाई फू फेम’ रत्नागिरीतील अभिनेते सचिन काळे यांनी मोलाची साथ दिली. स्पर्धेत स्पर्धकांना प्राप्त झालेल्या बक्षिसांची उद्घोषणा कार्यकारणी सदस्य श्रीकांत पाटील, अनुया बाम, ॲड. रजनी सरदेसाई, नाट्य परिषदेचे सदस्य विनायक जोशी आणि खजिनदार सतीश दळी यांनी केली. आभार प्रदर्शन आणि स्पर्धेतील नाटकांना दिले जाणारे गुणांकन याविषयी स्पर्धा प्रमुख अमेय धोपटकर यांनी माहिती दिली.
ठाकरे चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी प्रवीण तरडे यांनी आपल्याला कसे सहकार्य केले, याचा अनुभव कार्यकारणी सदस्य सुनील बेंडखळे यांनी विषद केला.
स्पर्धकांच्या वतीने मनोगत व्यक्त करताना जयप्रकाश पाखरे यांनी स्पर्धेचे नियोजन, परीक्षकांचे नियोजन, आणि स्पर्धेचा निकाल याबाबत समाधान व्यक्त केले. तसेच गुणांकन कशा प्रकारे केले जाते याची माहिती स्पर्धकांना द्यावी, असेही नमूद केले.
बक्षीस समारंभाचा सोहळा यशस्वी होण्यासाठी नाट्य परिषदेचे कार्यकारणी सदस्य सनातन रेडीज, घनश्याम मगदूम, दादा कदम, डॉ. आनंद आंबेकर, संतोष सनगरे, विजय पोकळे, सुधाकर बेहेरे आणि नाट्य परिषदेचे कार्यकारणी सदस्य यांनी मेहनत घेतली. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे परफॉर्मिंग आर्टच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी तसेच सिद्धेश बंदरकर यांची पूर्ण टीम यांनी नाट्यगृहातील आसन व्यवस्था, पाहुण्यांचे स्वागत आणि रंगमंच व्यवस्था उत्तमरीत्या पाहिली.
नाट्यगृहातील कर्मचारी धनवंत कासेकर आणि सागर सकपाळ तसेच इतर सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रमाला उत्तम रित्या सहकार्य केले.




