
आंबेत पुलाला तीन बार्जेसची धडक; रायगड-रत्नागिरीदरम्यानची वाहतूक बंद
रत्नागिरी : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या आंबेत पुलाला सोमवारी पहाटे तीन बार्जेसची धडक बसल्याची घटना घडली. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुलावरील दोन्ही बाजूंची वाहतूक तातडीने बंद केली असून मुंबई मंडळ वाहतूक मार्गही काही काळासाठी बंद करण्यात आला आहे.
घटनेनंतर संबंधित यंत्रणांकडून पुलाच्या सुरक्षिततेची तपासणी सुरू करण्यात आली आहे. पुलाच्या संरचनेची पाहणी पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आंबेत पूल हा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. या पुलामुळे दोन्ही जिल्ह्यांतील प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या कार्यकाळात या पुलाची उभारणी करण्यात आली होती.
तीन बार्जेसच्या धडकेमुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून तपासणी अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आले.




