
रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयास ‘ग्रंथपाल कै.संध्या देशमुख-मुळे’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
रत्नागिरी, दि. ६ जुलै : रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या ग्रंथसंवर्धन, वाचनसंस्कृतीच्या जतन-संवर्धन तसेच वाचकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर यांनी सन २०२५ सालचा प्रतिष्ठेचा ‘ग्रंथपाल कै.संध्या देशमुख-मुळे’ राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे ग्रंथप्रसार, वाचनसंस्कृती संवर्धन आणि ग्रंथालय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, वाचनालयाच्या
पुरस्कारासाठी १८२८ मध्ये म्हणजे १९९ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रत्नागिरी येथील आपल्या ग्रंथसंपदालयाचे व वाचनालयाचे कार्य, ग्रंथसंपदा, संदर्भसाहित्याचे जतन व संवर्धन करून वाचकांसाठी व अभ्यासकांसाठी आधुनिक पद्धतीने केलेली सोय इत्यादी चौफेर कार्याची नोंद घेऊन पुरस्कारासाठी वाचनालयाची निवड, पुरस्कार निवड समितीने केली आहे.
पुरस्कार वितरण समारंभ बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृह, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक म. पटवर्धन यांना पाठविलेल्या अधिकृत पत्राद्वारे पुरस्काराची माहिती दिली असून, या पुरस्कारामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे तसेच सातत्यपूर्ण कार्याचा हा राज्यस्तरीय सन्मान मानला जात आहे.




