बाबाजीराव जाधव यांनी घेतली सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट


अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांना झालेल्या नुकसानीवर प्रामुख्याने चर्चा


राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी भेट घेऊन सहकार क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी कोकणातील आंबा बागायतदारांना अवकाळी पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीचा मुद्दा प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला.
कोकणातील अनेक भागांमध्ये झालेला अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि सतत बदलणारे हवामान यामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून यंदाच्या हंगामावर गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर बाबाजीराव जाधव यांनी मंत्र्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती देत बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्यात यावी, तसेच शासनाने विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय ग्रामीण भागातील सहकारी संस्थांच्या अडचणी, शेतकरी हिताच्या योजना आणि सहकार क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली.
कोकणातील शेतकरी आणि आंबा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अवकाळी पावसामुळे चिंतेत असलेल्या आंबा बागायतदारांना या भेटीतून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button