
दहिवलीतील शेलारवाडीत भूस्खलन; घराचा भाग कोसळून दोघे बेपत्ता, बचावकार्य सुरू
खेड तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दहिवली गावातील शेलारवाडीत मंगळवारी भूस्खलनाची गंभीर घटना घडली. डोंगराचा काही भाग घरावर कोसळल्याने घरातील तिघेजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती निर्माण झाली.
घटनास्थळी ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू करत कल्पना शेलार यांना सुखरूप बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी कळबणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शांताराम शेलार आणि सतीश शेलार हे अद्याप बेपत्ता असून ते ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी महसूल विभाग, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव व शोधमोहीम सुरू आहे.
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात आणखी भूस्खलनाचा धोका कायम असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




