
खेड तालुक्यातील स्वयंघोषित कोकरे महाराज पोक्सो प्रकरणाचा तपास सीआयडीकडे
खेडमधील स्वयंघोषित महाराज भागोजी कोकरे ऊर्फ कोकरे महाराज याच्याविरुद्ध दाखल असलेल्या पोक्सो प्रकरणाच्या तपासावर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. हा तपास महाराष्ट्र राज्य गुन्हे अध्येषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्याचे आदेश न्यायमूर्ती वृषाली व्ही. जोशी आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांनी दिले. तसेच संपूर्ण तपास ’डी नोव्हो’ म्हणजेच नव्याने करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
पीडित मुलीच्या आईने दाखल केलेल्या याचिकेत, संशयित भागोजी ऊर्फ भगवान कोकरे हा खेड येथे श्री संत ज्ञानेश्वर जीवनमुक्ती धाम सेवा संस्थान गोशाळेच्या अखत्यारीत अध्यात्मिक वारकरी गुरुकुल चालवतो, यामध्ये शिक्षण घेणार्या मुलीवरील अत्याचारानी तपास अत्यंत निष्काळजी आणि कायद्याला धरून आरोप केला होता. याचिकेनुसार, पोलिसांनी आरोपपत्रात अल्पवयीन पीडितेचे नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक यांसारखी गोपनीय माहिती उघड केली, तसेच पोक्सो कायद्यातील आवश्यक कलमे लागू केली नाहीत आणि पीडितेचा जबाबही पोलीस ठाण्यात नोंदवला असल्याने हे कायद्याच्या विरोधात असल्याचे नमूद केले होते. सुनावणीदरम्यान न्यायालयाने तपास अधिकार्याला केस डायरी साट करण्याचे निर्देश दिले. मात्र, नियमित केस डायरीच अस्तित्वात नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्याऐवजी किरकोळ कागदपत्रे सादर करण्यात आली होती. या ढिसाळ कामकाजावर आणि ’पोक्सो ’विषयी झालेल्या हलगर्जीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली. रत्नागिरी पोलिसांच्या या सदोष तपासामुळे आठ महिन्यांहून अधिक कालावधी वाया गेल्याचे नमूद केले.




