
खेडमध्ये सायबर फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल; विविध राज्यांतील नागरिकांची हजारो रुपयांची फसवणूक
खेड : खेड पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीच्या दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मधील बँक खात्यांचा वापर करून विविध राज्यांतील नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
पहिल्या प्रकरणात, ५ ऑगस्ट २०२५ ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एसबीआयच्या एका खात्याद्वारे रायगड आणि मुंबई येथील तीन तक्रारदारांकडून एकूण २० हजार ५०० रुपये स्वीकारून फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० च्या कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणात, १९ मार्च २०२५ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत एसबीआयच्या दुसऱ्या खात्याचा वापर करून बिहार, दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील चार तक्रारदारांकडून एकूण ६० हजार ९२० रुपये जमा करून फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातही भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींनी संगनमताने बँक खाती उघडून त्यांचा वापर सायबर फसवणुकीसाठी केल्याचा आरोप असून खेड पोलीस पुढील तपास करत आहेत.




