‘कोकण दर्शन’मधून उलगडणार पावसाळी पर्यटन…

31 जुलै रोजी प्रसारण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पूर्वी पर्यटनाचा हंगाम ठरावीक काळापुरताच मर्यादित असायचा. मात्र गेल्या काही वर्षांत पावसाळी पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून, कोकणातील नयनरम्य धबधबे आणि हिरवाईने नटलेला निसर्ग अनुभवण्यासाठी पर्यटक पावसाळ्यातही आवर्जून कोकणात येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना अर्थार्जनाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.
याच विषयावर आधारित आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘कोकण दर्शन’ या पर्यटन विशेष कार्यक्रमाचे प्रसारण शुक्रवार, 31 जुलै रोजी सकाळी 8.40 वाजता होणार आहे.


‘पावसाळी पर्यटन आणि रत्नागिरीतले धबधबे’ या विषयावर कोकण शाश्वत पर्यटनासाठी कार्यरत तसेच पुरातत्त्व आणि संस्कृती अभ्यासक ऋत्विज आपटे यांनी पावसाळी पर्यटनाचे वाढते महत्त्व, कोकणातील पर्यटनाच्या संधी आणि त्यातून ग्रामीण भागाला मिळणारे आर्थिक बळ याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
तसेच आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत गणेश चौगुले यांनी धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी नेमका कोणता काळ योग्य असतो, धबधब्यांच्या परिसरात वावरताना कोणती खबरदारी घ्यावी, सुरक्षिततेचे कोणते नियम पाळावेत तसेच स्थानिक नागरिकांचे मार्गदर्शन घेणे का आवश्यक आहे, याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रानपाट, सवतसडा, सवतकडा, मार्लेश्वर, टिकलेश्वर, पानवल, उक्षी यांसह अनेक लहान-मोठे धबधबे पावसाळ्यात प्रवाहित होतात. यापैकी काही धबधबे बारमाहीही पर्यटकांना आकर्षित करतात. या धबधब्यांची वैशिष्ट्ये, पर्यटनाच्या संधी आणि सुरक्षित पर्यटनाचा संदेश या कार्यक्रमातून श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे लेखन सोनाली सावंत यांचे असून निवेदन आणि निर्मिती सहाय्य वंदना मुसळे आणि सोनाली सावंत यांनी केले आहे. सादरकर्ते विवेक वानखडे आहेत.
हा कार्यक्रम आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या 1143 kHz मध्यम लहरी, 101.5 FM, तसेच NewsOnAir मोबाईल अॅपवर थेट ऐकता येणार असून YouTube airratnagiri1248 यावर हा कार्यक्रम प्रसारणानंतर श्रोत्यांना ऐकता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button