
अहवाल नको, प्रत्यक्ष काम करा, पंचायत समितीचे सभापती प्रवीण पांचाळ
रत्नागिरी तालुक्यातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, तक्रारींसाठी महावितरणच्या कर्मचार्यांकडून फोन न उचलणे, निकृष्ट दर्जाचे वीज खांब तसेच अर्धवट आणि सदोष भूमिगत वीजवाहिन्यांची कामे यावरून रत्नागिरी पंचायत समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेत महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ’केवळ अहवाल नको, प्रत्यक्ष काम करून दाखवा, अशा शब्दांत पंचायत समितीचे सभापती प्रवीण पांचाळ यांनी महावितरणच्या अधिकार्यांना खडसावले.
जिल्हा परिषदेच्या लोकनेते शामराव पेजे सभागृहात शुक्रवारी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती प्रवीण पांचाळ होते. उपसभापती गजानन धनावडे, गटविकास अधिकारी चेतन शेळके तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. सभेत सदस्य विद्या बोंबले, वैभव पाटील यांच्यासह अनेक सदस्यांनी पावसाळ्यातही वारंवार खंडित होणार्या वीजपुरवठ्याबाबत संताप व्यक्त केला. तक्रारी करण्यासाठी संपर्क साधला असता महावितरणचे कर्मचारी फोन उचलत नसल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. यावर सभापती व उपसभापती यांनी संबंधित कर्मचार्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देत, नागरिकांशी समन्वय ठेवण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले.




