रघुवीर घाटातील एसटी सेवा बंद; २१ गावांचा दळणवळणाचा प्रश्न ऐरणीवर

खेड : मुसळधार पावसामुळे रघुवीर घाटातील रस्ता खचल्याने खेड-आकल्पे एसटी बससेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील २१ गावांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
रघुवीर घाटात रस्ता खचण्यासह दरड कोसळण्याचा धोका वाढल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून ही बससेवा बंद केली आहे. यापूर्वी घाटातील धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन १० जुलैपासून रघुवीर घाट पर्यटकांसाठी एक महिन्याकरिता बंद करण्यात आला आहे. मात्र, घाटाच्या पलीकडील २१ गावांतील नागरिकांना आवश्यक प्रवासासाठी मर्यादित स्वरूपात मार्गाचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली होती.
सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील ही गावे रघुवीर घाटामार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याशी जोडली गेली आहेत. या भागातील नागरिक, विद्यार्थी तसेच शासकीय व इतर कामांसाठी दररोज खेडला येणाऱ्यांसाठी खेड-आकल्पे ही एसटी सेवा महत्त्वाची मानली जाते. मात्र, घाटातील रस्ता धोकादायक झाल्याने ही सेवा कालपासून बंद करण्यात आल्याची माहिती खेड आगाराचे प्रमुख श्री. मलुष्टे यांनी दिली.
दरम्यान, घाटात दरड कोसळण्याची शक्यता कायम असल्याने नागरिकांनी तसेच पर्यटकांनी रघुवीर घाट परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button