
जगबुडी नदीच्या पाणीपातळीत वाढ; खेड शहर पुराच्या उंबरठ्यावर, महामार्गावरील एक लेन बंद

खेड : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जगबुडी आणि नारंगी नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीकाठच्या सखल भागात पाणी शिरू लागल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पीरलोटे ते परशुरामदरम्यान दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाल्याने एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी दुथडी भरून वाहत असून मच्छी मार्केट परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. मटण मार्केटजवळ नदीची पातळी पूर नियंत्रण रेषेजवळ पोहोचली असून पावसाचा जोर कायम राहिल्यास बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

नारंगी नदीही ओसंडून वाहत असून खेड-दापोली मार्गालगतची विस्तीर्ण भातशेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सततच्या पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठाही विस्कळीत झाला आहे. अनेक गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वीज खंडित असून महावितरणकडून पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, प्रतिकूल हवामानामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे येत आहेत.
दरम्यान, नागरिकांनी जगबुडी नदीतील गाळ उपशामुळे यंदा शहराला पुराचा तुलनेने कमी फटका बसल्याचे सांगितले. सलग तिसऱ्यांदा बाजारपेठ पुराच्या उंबरठ्यावर असूनही नदीचे पाणी शहरात न शिरल्याने गाळ उपशाचा सकारात्मक परिणाम दिसून आल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच जगबुडी नदीच्या संगमावरील बेट हटविल्यास खेड शहर कायमस्वरूपी पुरमुक्त होण्यास मदत होईल, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली. या संदर्भात आवश्यक कार्यवाहीसाठी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम लक्ष देत असल्याची माहिती नगरसेवक स्वप्नील सैतवडेकर यांनी दिली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पीरलोटे ते परशुराम घाटादरम्यान डोंगराचा भाग खचल्याने दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून लोटे वाहतूक पोलिसांनी मुंबईहून गोव्याकडे जाणारी एक लेन वाहतुकीसाठी बंद केली आहे. सध्या वाहतूक एकाच लेनवरून संथ गतीने सुरू असून वाहनचालकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रवास करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.




