
संगमेश्वरात ऑनलाईन फसवणुकीचा धक्कादायक प्रकार; पती-पत्नीच्या खात्यातून २.१४ लाख रुपये लंपास
संगमेश्वर तालुक्यात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, संगमेश्वर बाजारपेठेतील एका किराणा व्यापारी व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून अज्ञात सायबर भामट्यांनी तब्बल २ लाख १४ हजार १४८ रुपये परस्पर काढून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तौफिक जिकर मेमन (वय ३९, रा. नावडी, ता. संगमेश्वर) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. ३० मे रोजी सायंकाळी ६.२७ ते ७.१२ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँक ऑफ इंडिया येथील खात्यातून ८९ हजार १४९ रुपये, तर त्यांच्या पत्नी फौजिया तौफिक मेमन यांच्या खात्यातून १ लाख २४ हजार ९९९ रुपये अशी एकूण २ लाख १४ हजार १४८ रुपयांची रक्कम ऑनलाईन व्यवहाराद्वारे परस्पर वळती करून घेतली.
घटना लक्षात येताच संबंधितांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपले बँक खाते क्रमांक, ओटीपी, पासवर्ड, यूपीआय पिन किंवा इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, तसेच संशयास्पद लिंक व संदेशांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे




