विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांनी ३१ ऑगस्टपूर्वी हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाइन जनरेट करण्याचे तहसीलदार विकास गंबरे यांचे आवाहन; ‘Beneficiary Satyapan App’द्वारे विनाशुल्क सुविधा


राजापूर : केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले Digital Life Certificate (DLC) अर्थात हयातीचे प्रमाणपत्र दि. ३१ ऑगस्ट २०२६ पूर्वी ऑनलाइन जनरेट करावे, असे आवाहन राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे यांनी केले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांअंतर्गत दरमहा अर्थसहाय्य मिळणाऱ्या लाभार्थ्यांसाठी ग्रामविकास मंत्रालयाने ‘Beneficiary Satyapan App’ विकसित केले आहे. या प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र विनाशुल्क ऑनलाइन जनरेट करता येणार आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ अर्थसहाय्य योजना, संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आदी योजनांचा लाभ घेणाऱ्या ज्या लाभार्थ्यांनी अद्याप हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाइन जनरेट केलेले नाही, त्यांनी दि. ३१ ऑगस्टपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
आधारकार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक
हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाइन जनरेट करण्यासाठी संबंधित लाभार्थ्याचे आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. लाभार्थी स्वतः किंवा त्यांच्या नातेवाईकांपैकी Android मोबाईल असलेली व्यक्ती Beneficiary Satyapan App तसेच Aadhaar Face RD हे अॅप डाउनलोड करून हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाइन जनरेट करू शकते.
ज्या लाभार्थ्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना ऑनलाइन हयातीचे प्रमाणपत्र जनरेट करण्यात अडचण येत असेल, त्यांनी संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालक, तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी शाखा किंवा महा ई-सेवा केंद्राशी संपर्क साधावा.
महा ई-सेवा केंद्रामार्फत ही प्रक्रिया करून घेतल्यास ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. संबंधित लाभार्थ्यांनी दि. ३१ ऑगस्ट २०२६ पूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधून हयातीचे प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि महसूल प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार विकास गंबरे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button