वावे गावाचा रस्ता धोकादायक; निधी मंजूर करून तातडीने काम सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी


खेड तालुक्यातील मौजे वावे तर्फे खेड येथील गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत खराब अवस्था झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुसळधार पावसामुळे रस्ता अधिकच धोकादायक बनला असून सकाळची एसटी बससेवाही बंद झाली आहे. परिणामी गावाचा बाहेरील भागाशी संपर्क मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे.

चंडिका माता ग्राम विकास मंडळ (रजि.) वावे गावठाणचे सल्लागार दिनेश रघुनाथ उतेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, संबंधित रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १ कोटी ९६ लाख ७५ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता नमूद केली आहे. मात्र अद्याप निधी मंजूर न झाल्याने रस्त्याचे काम रखडले असून ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका किंवा अन्य वाहने गावापर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. विशेषतः गंभीर रुग्ण, गर्भवती महिला किंवा इतर आपत्कालीन सेवांसाठी हा प्रश्न चिंतेचा विषय ठरत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्थानिक आमदार, पालकमंत्री तसेच माजी आमदार यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून आवश्यक निधी मंजूर करावा, अशी मागणी केली आहे. रस्त्याचे काम त्वरित सुरू करून गावाचा संपर्क पूर्ववत करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर पुढील काळात लोकआंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button