
लांज्यात भरवस्तीत घरफोडी; ९० हजारांची रोकड लंपास
लांजा शहरातील गोंडेसखल रोड परिसरात भरवस्तीत घरफोडीची घटना घडून अज्ञात चोरट्याने घरातील ९० हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोंडेसखल रोड येथील रवींद्र राजाराम पावसकर (वय ६०) यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना १६ जून रोजी रात्री ९.३० ते १७ जून रोजी दुपारी १.५५ या कालावधीत घडली.
रवींद्र पावसकर हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. १७ जून रोजी दुपारी घरी परतल्यानंतर त्यांना घराचा दर्शनी दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. दरवाजाची कडी-कोयंडा उचकटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता हॉलमधील सामान सुस्थितीत होते. मात्र, बेडरूममधील लाकडी कपाटाच्या उजव्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली ९० हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे आढळून आले.
ही रक्कम त्यांच्या मुलाच्या आजारपणावरील उपचारांसाठी ठेवण्यात आली होती. अज्ञात चोरट्याने ही रोकड लंपास केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पावसकर यांनी तातडीने लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.




