
राजापूर आगाराला ‘राजमाता जिजाऊ’च्या पाच नव्या एस.टी. बस; प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुखकर
राजापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपक्रम आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा नवीन बस सेवांचा विस्तार करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून राजापूर आगाराला रत्नागिरी विभागीय कार्यालयामार्फत ‘राजमाता जिजाऊ’ मालिकेतील पाच नवीन एस.टी. बस प्राप्त झाल्या आहेत. या बस आगारात दाखल झाल्याने राजापूर तालुक्यातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एस.टी. महामंडळाच्या आधुनिकीकरणावर विशेष भर दिला आहे. प्रवाशांना उत्तम सेवा देण्याच्या उद्देशाने महामंडळाच्या ताफ्यात नवीन बसगाड्यांची भर घालण्यात येत असून, यापूर्वी ‘लालपरी’ बस सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक बस राज्यभरातील विविध आगारांमध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
राजापूर आगाराला यापूर्वी दहा ‘लालपरी’ बस मिळाल्या होत्या. त्यासाठी आमदार किरण सामंत यांनी विशेष पाठपुरावा केला होता. त्याच प्रयत्नांचा पुढचा टप्पा म्हणून आता पाच नवीन ‘राजमाता जिजाऊ’ बस रविवारी राजापूर आगारात दाखल झाल्या आहेत. या बस उपलब्ध करून देण्यासाठीही आमदार किरण सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले जात आहे.
भगवा आणि पांढऱ्या रंगसंगतीतील आकर्षक रचनेच्या या बसमध्ये २ बाय ३ अशी आसन व्यवस्था असून एकूण ५५ प्रवाशांसाठी आसने उपलब्ध आहेत. तसेच प्रत्येक आसनाजवळ मोबाईल चार्जिंग पॉइंटची सुविधा देण्यात आल्याने प्रवाशांना प्रवासादरम्यान मोठी सोय होणार आहे.
या नव्या बस प्रारंभी राजापूर-रत्नागिरी मार्गावर धावणार असून, त्यानंतर विभाग नियंत्रकांच्या आदेशानुसार लांब पल्ल्याच्या मार्गांवरही त्यांची सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राजापूर आगार प्रमुख अजित गोसराडे यांनी दिली.
दरम्यान, राजापूर आगाराला आणखी दहा ‘लालपरी’ आणि पाच ‘राजमाता जिजाऊ’ बस मिळाल्यास आगाराची प्रवासी सेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक होईल. यासाठी आमदार किरण सामंत यांचा पाठपुरावा सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.




