
रस्ते अपघातमुक्त जिल्ह्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाची व्यापक “झिरो ॲक्सिडेंट ड्राईव्ह” मोहीम
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राणघातक रस्ते अपघातांचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेनुसार १ जूनपासून “झिरो ॲक्सिडेंट ड्राईव्ह” ही विशेष मोहीम संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली आहे.
या विशेष मोहिमेदरम्यान १ जून ते ८ जून या कालावधीत वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती तसेच विविध संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून अपघात प्रतिबंधासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. या कालावधीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध ४०१ गुन्हे नोंद करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध १७३ केसेस करण्यात आल्या आहेत. वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन धारकांविरुद्ध १६२ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. तसेच दुचाकी वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न करणाऱ्या १० चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वं १८ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष जनजागृती कार्यक्रम, मार्गदर्शन सत्रे, शाळा-महाविद्यालयांमधील जनजागृतीपर उपक्रम तसेच नागरिकांमध्ये संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
याशिवाय राष्ट्रीय महामार्गावरील अपघात प्रतिबंधक उपाययोजनांसाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच संबंधित विभागांशी विशेष समन्वय साधण्यात आला आहे. त्यानुसार संभाव्य अपघात क्षेत्र व संवेदनशील ठिकाणी सूचना फलक, वेगमर्यादा फलक व दिशा दर्शक फलक बसविण्यात आले आहेत. विशेषतः हातखंबा (रत्नागिरी) तसेच भोस्ते घाट (खेड) येथे आवश्यक वाहतूक सुरक्षितता उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच महामार्ग व प्रमुख मार्गांवर वाहनांचा वेग नियंत्रित राहण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी रंबलर्स बसविण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत रस्ते सुरक्षेला प्राधान्य देऊन “झिरो ॲक्सिडेंट ड्राईव्ह” अंतर्गत येत्या काळातही अशाच प्रभावी कारवाया, जनजागृती कार्यक्रम व समन्वयात्मक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
मद्यपान करून वाहन चालविणे टाळावे, वेगमर्यादांचे पालन करावे, दुचाकी चालविताना हेल्मेट व चारचाकी वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करावा, वाहतुकीचे नियम पाळावेत आणि रस्ते अपघात मुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.




