रत्नागिरीत डाक विभागाची ‘फ्री पिकअप’ सेवा सुरू; पार्सल आणि पत्रे आता घरातूनच संकलित होणार


रत्नागिरी : भारतीय डाक विभागाने ग्राहकांच्या सोयीसाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत रत्नागिरी विभागात ‘फ्री पिकअप’ सेवा सुरू केली आहे. १ जूनपासून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे ग्राहकांना पार्सल किंवा पत्रे पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची गरज राहणार नाही.

या सेवेसाठी विशेष वाहनाची व्यवस्था करण्यात आली असून ते रत्नागिरी शहरासह एमआयडीसी परिसरात फिरून ग्राहकांच्या ठिकाणाहून पार्सल आणि पत्रांचे संकलन करणार आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीची दखल घेत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती डाकघर अधीक्षक यांनी दिली.

या उपक्रमामुळे ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाचणार असून विशेषतः व्यावसायिक ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. ‘बुक नाऊ पे लेटर’ (BNPL) करार करणाऱ्या ग्राहकांना या सेवांचा अधिक प्रभावीपणे लाभ घेता येणार आहे. ई-कॉमर्स आणि पार्सल व्यवसायात कार्यरत असलेल्या व्यापाऱ्यांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

सुमारे १७६ वर्षांची परंपरा लाभलेल्या भारतीय डाक विभागाने बदलत्या काळानुसार आपल्या सेवांमध्ये सातत्याने सुधारणा केली आहे. पारंपरिक टपाल सेवांसोबतच ग्राहकाभिमुख आणि व्यवसायाभिमुख सेवा उपलब्ध करून देत विभागाने आपली विश्वासार्हता कायम राखली आहे.

आजच्या स्पर्धात्मक पार्सल सेवा क्षेत्रात अनेक खासगी कंपन्या कार्यरत असल्या तरी भारतीय डाक विभाग आपल्या व्यापक नेटवर्क, विश्वासार्ह सेवा आणि ग्राहकांप्रती असलेल्या बांधिलकीमुळे वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे. रत्नागिरीत सुरू झालेल्या या नव्या सुविधेचे नागरिक आणि व्यावसायिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विपणन अधिकारी गजानन करमरकर, रवींद्र घडशी, रत्नागिरी पोस्ट ऑफिसचे अधिकारी तसेच प्रधान डाकघरातील कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button