आंबा घाटातील रस्त्याला भेगा; उद्या तातडीने कारवाई होणार!आमदार किरण सामंत यांची घटनास्थळी पाहणी; जिल्हाधिकाऱ्यांसोबत होणार सविस्तर चर्चा


राजापूर : गेल्या दोन आठवड्यांपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतूक व्यवस्थेलाही बसू लागला आहे. कोल्हापूर–रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरील आंबा घाटात काही ठिकाणी रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आंबा घाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घातली आहे.
रस्त्याची धोकादायक स्थिती समोर येताच लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी नियोजित दौऱ्यात बदल करून तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची सविस्तर माहिती घेत प्रत्यक्ष पाहणी केली तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या.
पाहणीदरम्यान रस्त्यावरील भेगा, मुसळधार पावसामुळे झालेली जमिनीची हालचाल आणि संभाव्य धोका याची त्यांनी बारकाईने पाहणी केली. आंबा घाटातून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड व प्रवासी वाहतूक होत असल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
या पार्श्वभूमीवर उद्या रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्यासोबत सविस्तर बैठक होणार असून, त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून पुढील उपाययोजनांवर निर्णय घेतला जाणार आहे.
रस्त्याच्या सुरक्षिततेचा तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यक दुरुस्ती, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन तसेच पर्यायी मार्गांची व्यवस्था याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही देण्यात आली.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा दुवा असलेल्या आंबा घाटातील रस्त्याची सुरक्षितता कायम राखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत असून, उद्या होणाऱ्या बैठकीतील निर्णयाकडे वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button