रत्नागिरी पोलीस दल ’भरती’ चे की ’बदली’ केंद्राचे


रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात सुमारे १७५० पदे मंजूर असून, दरवर्षी शंभर ते वीडशे नवीन कर्मचार्‍यांची भरती होते आणि तितके च कर्मचारी निवृत्त होतात. मात्र, राज्यभरातून परीक्षा देऊन येथे रुजू होणारे बहुतांश बाहेरचे उमेदवार काही वर्षांतच विविध कारणे पुढे करून मूळ जिल्ह्यात जाण्यासाठी धडपडत असतात. याचे विदारक चित्र यंदा पाहायला मिळत असून, तब्बल ८५० पोलीस कर्मचार्‍यांनी आपल्या मूळ जिल्ह्यात बदली व्हावी यासाठी पोलीस अधिक्षक कार्यालयात अर्ज दाखल केले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक उमेदवारांचे प्रमाण तुलनेत कमी असल्यामुळे परजिल्ह्यातील तरुण भरती प्रक्रियेत बाजी मारतात. नियमानुसार, नवीन पोलीस शिपायाला किमान आठ वर्षे सेवा बजावल्याशिवाय अन्य जिल्ह्यात बदली करता येत नाही. परंतु, या नियमाला बगल देण्यासाठी कागदोपत्री क्लृप्त्या शोधल्या जातात. वैद्यकीय कारणे, पती- पत्नी एकत्रीकरण सेवा, आई- वडील किंवा सासू-सासरे आजारी असल्याची असल्याची खोटी किंवा कागदोपत्री कारणे पुढे करून कायदेशीर पळवाटा शोधल्या जातात.
रुजू झाल्यापासून अवघ्या काही वर्षांतच मूळ गावी जाण्यासाठी पोलीस कर्मचारी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असतात. एकाचवेळी तब्बल ८५० जणांनी बदलीसाठी अर्ज केल्यामुळे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर आणि मनुष्यबळावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button