रत्नागिरीच्या किनारपट्टीला विकासाची नवी झेप; ८५.८४ कोटींच्या प्रकल्पांना हिरवा कंदील


गुहागरमध्ये जेटी रस्ता व संरक्षक बंधाऱ्यास मंजुरी; मच्छीमार, पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा


रत्नागिरी जिल्ह्याच्या विस्तीर्ण सागरी किनारपट्टीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. किनारपट्टीवरील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासह मच्छीमारांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यातील सहा महत्त्वाच्या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या कामांसाठी तब्बल ८५ कोटी ८४ लाख ३० हजार ५८४ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळाने सादर केलेल्या प्रस्तावांनुसार मत्स्यव्यवसाय, बंदरे व खनिकर्म विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीत या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या किनारपट्टी विकासाच्या योजनांना आता प्रत्यक्ष गती मिळणार आहे.

गुहागर तालुक्यासाठी विशेष महत्त्वाच्या दोन प्रकल्पांचाही या मंजुरीत समावेश करण्यात आला आहे. अंजनवेल येथील भोईवाडी जेट्टीपर्यंतच्या जोडरस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी १४ कोटी १० लाख ४० हजार ५४४ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या रस्त्यामुळे जेट्टीपर्यंतची वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होणार असून मच्छीमारांना मोठा लाभ मिळणार आहे.

याशिवाय, पडवे समुद्रकिनाऱ्यावरील वाढत्या किनारधुपीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधुनिक संरक्षक बंधारा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी १४ कोटी ९ लाख ८६ हजार ४६७ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे समुद्राच्या उधाणापासून किनारी वस्तीचे संरक्षण होण्यास मदत होणार आहे.

या विकासकामांमुळे गुहागरसह संपूर्ण रत्नागिरी किनारपट्टीतील पर्यटनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मच्छीमारांसाठी आवश्यक सुविधा, किनारी गावांचे संरक्षण आणि पर्यटनवाढ या तिन्ही क्षेत्रांना या प्रकल्पांचा थेट लाभ होणार असून स्थानिक रोजगार व अर्थकारणालाही बळकटी मिळणार आहे. परिणामी, रत्नागिरीच्या किनारपट्टीच्या विकासाला नवी गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button