
‘मी तुमच्यापेक्षा १० पटीने जास्त ओरडू शकतो, दादागिरी चालणार नाही’, प्रवीण दरेकर अन् बच्चू कडूंमध्ये सभागृहात जुंपली!
: सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान विधानसभा आणि विधानपरिषदेत विविध विषयांवर चर्चा पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवरच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यांवर विधानपरिषदेत चर्चा सुरू होती. यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्यांवरून विधानपरिषदेत भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सभागृहात काहीवेळ गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत प्रश्न विचारला. त्यानंतर सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उत्तर देण्यास सुरूवात केली. पण मंत्री बाबासाहेब पाटील हे उत्तर देत असतानाच बच्चू कडू यांनी पुन्हा प्रतिप्रश्न केला. त्यामुळे आमदार प्रवीण दरेकर हे चांगलेच भडकले. ‘मी तुमच्यापेक्षा १० पटीने जास्त ओरडू शकतो, दादागिरी चालणार नाही’, अशा शब्दांत प्रवीण दरेकर यांनी बच्चू कडू यांना सुनावलं.
सभागृहात नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री बाबासाहेब पाटील हे सभागृहात बोलत होते. ते म्हणाले की, “राज्य सरकारने कर्जमाफी कोणत्याही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेली नाही. किंवा कोणत्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दिलेली नाही. पुढील काही वर्ष कोणत्याही मोठ्या निवडणुका नाहीत. असं असतानाही सरकारने कर्जमाफी केली”, असं मंत्री बाबासाहेब पाटील सभागृहात बोलत होते. मात्र, तितक्यात आमदार बच्चू कडू यांनी प्रश्न विचारले. कडू म्हणाले की, “माझं मत असं आहे की आम्ही जेव्हा काही प्रश्न मांडलेत किंवा काही सूचना केल्या आहेत, त्याबाबत उत्तरे मिळाली पाहिजेत. आमच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडून मिळणार नाहीत असं दिसतंय”, असं बच्चू कडू यांनी म्हटलं.
मंत्री बाबासाहेब पाटील हे बोलत असताना बच्चू कडू यांनी त्यांना थांबवून मध्येच प्रश्न विचारल्यामुळे आमदार प्रवीण दरेकर हे चांगलेच भडकले. दरेकर म्हणाले की, “माझी आपल्याला विनंती आहे की याआधीही प्रश्न-उत्तराच्यादरम्यान असंच झालं आणि आताही. आता सरकार म्हणून राज्याचे मंत्री उत्तर देत असताना त्यांचं बोलणं पूर्ण होण्याच्या आधीच त्यांना डिस्टर्ब करणं योग्य नाही. मला वाटतं की सभागृहाची परंपरा आता बिघडायला लागली आहे. त्यामुळे सभापतींना माझी विनंती आहे की हे वारंवार होत आहे, पण यापुढे असं होणार नाही याची दक्षता घ्यावी”, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.
दरम्यान, त्यानंतर पुन्हा बच्चू कडू काहीतरी बोलले. यानंतर प्रवीण दरेकर हे बच्चू कडू यांच्यावर चांगलेच भडकले. दरेकर म्हणाले की, “तुम्हाला प्रश्नांची उत्तरे पाहिजेत की फक्त तुम्ही बोलता हे दाखवायचं आहे?” यानंतर बच्चू कडू म्हणाले की, “सभागृहातील चर्चा विषय सोडून दुसरीकडे चालली आहे, हे बरोबर नाही.” त्यानंतर दरेकर म्हणाले की, “सरकारच्या मंत्र्यांचं भाषण सुरू असताना अशा प्रकारे मध्ये डिस्टर्ब करणं बरोबर आहे का? तुम्ही (बच्चू कडू) ओरडू नका. आम्ही तुमच्यापेक्षा १० पटीने जास्त ओरडू शकतो. दादागिरी दाखवायची नाही, तुमच्या स्टाईलने सभागृहाचं कामकाज चालणार नाही. तुमच्यापेक्षा १० पटीने जास्त मी ओरडू शकतो. ज्यांना हुल मारायची त्यांना मारा, चल”, असं म्हणत प्रवीण दरेकर हे बच्चू कडू यांच्यावर संतापले.




