
महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास रखडला, आता राज्यावर दुहेरी संकट, कुठे मुसळधार पाऊस तर कुठे उष्णतेच्या लाटेचा इशारा!
केरळमध्ये 4 जून रोजी दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात मान्सून 6 जून रोजीच आला. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर राज्यांमधीलही प्रगती वेळेवर होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण त्यानंतर मान्सूनचा प्रवास मंदावला असून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यासाठी आणखी 2 ते 3 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात मान्सूनची आगेकूच सुरूच आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मान्सून पश्चिम बंगाल, बिहार आणि ओडिशा आणि झारखंडच्या काही भागांमध्ये दाखल झाला आहे.
नेहमी 1 जून रोजी दाखल होणार मान्सून यंदा 3 दिवसांच्या विलंबाने केरळमध्ये धडकला. हवामान विभागाने तर मान्सूनआगमनासाठी 26 मेची तारीख दिली होती. त्यानंतर काहीच दिवसांत गोवा व कोकण किनारपट्टी व्यापल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाली होता. पण त्यानंतर मान्सूनचा प्रवास अर्ध्यातच रखडला. आता आगमनासाठी 15 जूनची तारीख दिली आहे.
मान्सून कशामुळे रखडला?
मुंबई-पुण्यात मान्सूनचं आगमन लांबलं आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि वायव्येकडील हवेच्या अस्थिरतेमुळे मान्सूनच्या नेहमीच्या प्रवाहात व्यत्यय निर्माण झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या 2-3 दिवसांमध्ये अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत, महाराष्ट्र, उर्वरित कर्नाटकात, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या उर्वरित भागांत मान्सूनची प्रगती होऊ शकते. तसेच, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागांसह छत्तीसगढमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होऊ शकतो. महाराष्ट्रात मान्सून सोलापूरमध्ये दाखल झाला असल्यामुळे मुंबईआगमनही जवळच असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
पण मान्सूनच्या आगमनापूर्वीच महाराष्ट्रात येत्या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. राज्यात कोकण, मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 12 ते 18 जून रोजी पाऊस होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता
एकीकडे नागरिक पावसाची प्रतीक्षा करत असताना मराठवाड्याला हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं असलं तरी उष्मा कायम आहे. हवामान विभागाने बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पण 13 जून रोजी, बहुतांश भागांत उन्हाचा तडाखा वाढणार आहे.
विदर्भातही उष्णतेच्या लाटेचा इशारा
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये 13 जून ते 16 जूनदरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होत असला तरी उन्हाचा चटका बसणार आहे. अमरावती, वाशिम, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसाठी अलर्ट देण्यात आला आहे. पण शनिवारी पहाटे अकोला जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला.




