
नाचणे वाडेकरवाडी शाळेला युवासेनेचा मदतीचा हात
'युवती मैत्रीण' देणार मोफत शिक्षण
रत्नागिरी : जिल्हा परिषद आदर्श शाळा नाचणे क्रमांक ३ (वाडेकर वाडी) येथे प्रशासकीय उदासीनतेमुळे संगणक संच धूळ खात पडल्याचे समोर आले आहे. शाळेत हक्काची संगणक लॅब असूनही केवळ संगणक प्रशिक्षक नसल्यामुळे गरीब व गरजू विद्यार्थी आधुनिक संगणक प्रशिक्षणापासून वंचित राहिले आहेत. ही गोष्ट युवासेनेच्या उपतालुका युवती अधिकारी सौ. पूजा ओंकार वाडेकर यांनी युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली. विद्यार्थ्यांचे हे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अखेर युवासेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक व सकारात्मक पाऊल उचलले असून, त्यांच्या वतीने शाळेत ‘युवती मैत्रीण’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शासनाकडून डिजिटल शिक्षणावर मोठा भर दिला जात असला, तरी नाचणे क्रमांक ३ या आदर्श शाळेत मात्र उलट चित्र पाहायला मिळत आहे. शाळेत संगणक संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परंतु, गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी तज्ज्ञ प्रशिक्षक किंवा शिक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. परिणामी, हे महागडे संगणक संच एका खोलीत बंद अवस्थेत धूळ खात पडून आहेत. ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्राथमिक ज्ञानही मिळत नसल्याने पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पाहून युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी थेट मध्यस्थी केली. केवळ प्रशिक्षका अभावी विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात राहू नये, यासाठी युवासेनेच्या वतीने ‘युवती मैत्रीण’ उपक्रमातील प्रशिक्षित शिक्षिका या शाळेत पाठवली जाणार आहे. या प्रशिक्षिका शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही शुल्काशिवाय, संपूर्णपणे मोफत संगणक प्रशिक्षण देणार आहेत.
युवासेनेच्या या सामाजिक आणि शैक्षणिक बांधिलकीच्या उपक्रमाचे नाचणे व वाडेकर वाडी परिसरातून जोरदार स्वागत होत आहे. ही जबाबदारी युवासेनेने उचलल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. या उपक्रमामुळे आता नाचणे शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा संगणकाचे की-बोर्ड आणि माउस हाताळता येणार असून, ते डिजिटल युगाशी जोडले जाणार आहेत.




