टीईटी परीक्षेवेळी बुरखा, दुपट्टा वापरण्याबाबत नव्या सूचना! परीक्षा परिषदेचे म्हणणे काय?

TET Exam : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या २८ जून रोजी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) महिला उमेदवारांना कोणतेही कपडे, दुपट्टा, ओढणी किंवा बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य राहील. मात्र, परीक्षेच्या वर्गखालीमध्ये उमेदवाराचा चेहरा मात्र पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. त्यामुळे मानेच्या वरील भाग म्हणजेच कान, डोके, चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा कपडा, आवरण असता कामा नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

टीईटी परीक्षेसाठी परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या नियमावलीमध्ये दुपट्टा, बुरखा, टोपी वापरता येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, महिला उमेदवारांना बुरखा, हिजाब, दुपट्टा वापरण्यास परवानगी देण्याबाबतची मागणी परीक्षा परिषदेकडे करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या निरीक्षणाचा संदर्भ देत डॉ. बेडसे यांनी यूपीएससी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, सीए, सीएस, एमपीएससी अशा विविध स्तरावरील परीक्षांमध्ये चेहरा झाकणारे दुपट्टा, बुरखा, स्कार्फ, टोपी, गॉगल यांना प्रतिबंध करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच ओळख पडताळणी, बायोमेट्रिक पडताळणी, परीक्षा कालावधीत सीसीटीव्ही पडताळणीमध्ये चेहरा स्पष्ट दिसणे आवश्यक असते. परीक्षांवेळी चेहऱ्यावर हिजाब, बुरखा, दुपट्टा यावर बंदी घालण्यामागे परीक्षा कालावधीत उमेदवारांवर बारकाईने लक्ष ठेवून गैरप्रकार रोखणे, ओळख पडताळणी करणे, परीक्षेची पारदर्शकता, विश्वासार्हता कायम ठेवण्याचा उद्देश आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षेवेळी गैरप्रकारासाठी मोबाइल बाळगणे, मोबाईलद्वारे प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲप, टेलिग्रामद्वारे बाहेर पाठवणे, मोबाइलद्वारे उत्तरे प्राप्त करून घेणे, कानामध्ये अतिशय लहान आकाराचे वायफाय, ब्लूटूथ ठेवणे अशा अनेक प्रकारच्या क्लुप्त्या अलीकडे वापरल्या जात आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील सर्वच उमेदवारांचा संपूर्ण चेहरा, मान, तोंड, कान हे अवयव स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहेत. तोंड झाकून ठेवल्यास कोण एकमेकांशी बोलत आहे, हे दिसणार नाही. तसेच परीक्षा केंद्रामध्ये संशयावरून पडताळणीसाठी एखाद्या महिला उमेदवारास चेहरा दाखवण्यास सांगितल्यास त्यातून वेगळाच प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेवेळी महिला उमेदवारांना कोणतेही कपडे, दुपट्टा, ओढणी किंवा बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य राहील. मात्र, परीक्षेच्या वर्गखोलीमध्ये चेहरा सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसला पाहिजे, असे नमूद करण्यात आले आहे.

डीएड, संगणक लघुलेखक परीक्षेवेळी गैरप्रकार

परिषदेतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या डीएड, संगणक लघुलेखक परीक्षेमध्ये उमेदवारांनी दुपट्टा, बुरख्यामध्ये मोबाइल लपवून परीक्षा केंद्रात आणल्याचे, त्याचा वापर केल्याचे निष्पन्न झाले होते. शिक्षक पात्रता परीक्षा ही अतिशय संवेदनशील परीक्षा असून, त्यात एआय, ब्लूटूथ, शर्टच्या बटनासारख्या इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर करून गैरप्रकार होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी उमेदवाराचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये दिसणे गरजेचे आहे, असेही डॉ. नंदकुमार बेडसे यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button