
एमएसएमई शिखर परिषद व पुरस्कारासाठी नामांकने सादर करण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. १९ ): एमएसएमई दिनानिमित्त वाशी, नवी मुंबई येथे २७ जून रोजी आयोजित ‘एमएसएमई शिखर परिषद व पुरस्कार वितरण सोहळ्या’मध्ये जिल्ह्यातील पात्र उद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच पुरस्कारांसाठी आपली नामांकने भरावीत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. अ. अ. आजगेकर यांनी केले आहे.
जागतिक बँकेच्या मदतीने राबविण्यात येणाऱ्या ‘रॅम्प’ (Raising and Accelerating MSME Performance – RAMP) कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC) तर्फे २७ जून, २०२६ रोजी वाशी येथील सिडको कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग संचालनालयाच्या निर्देशानुसार आयोजित केल्या जाणाऱ्या या शिखर परिषदेचा मुख्य उद्देश उद्योग क्षेत्रातील अग्रणी व्यक्ती, तज्ज्ञ, धोरणकर्ते तसेच एमएसएमई क्षेत्रातील प्रतिनिधींना एकत्र आणणे हा आहे. या माध्यमातून उद्योगवृद्धी, सहकार्य, नवकल्पना, शाश्वतता आणि जागतिक बाजारपेठेतील संधी यांवर सखोल चर्चा घडवून आणली जाईल.
या परिषदेदरम्यान, ‘रॅम्प’ उपक्रमांतर्गत उल्लेखनीय कामगिरी करून व्यवसायात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणाऱ्या सूक्ष्म व लघुउद्योगांना (MSME) विशेष एमएसएमई पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. उत्पादन क्षमता, नवोन्मेष, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शाश्वत विकास आणि उद्योगातील उत्कृष्ट कामगिरी या निकषांच्या आधारे पुरस्कार विजेत्यांची निवड केली जाणार आहे. एकूण आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातील.
नोंदणी आणि नामांकन प्रक्रिया
शिखर परिषदेतील सहभागासाठी: इच्छूक उद्योजकांनी https://mahamsmeawards.in/summit या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणी केल्यानंतरच परिषदेतील सहभाग निश्चित मानला जाईल.
पुरस्कार नामांकनासाठी: पात्र सूक्ष्म व लघुउद्योगांनी https://mahamsmeawards.in या संकेतस्थळावर जाऊन आपले नामांकन (Nomination) सादर करावे.
पुरस्कारासाठी पात्रता व अटी
पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या उद्योगांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
१. उद्योग महाराष्ट्रात नोंदणीकृत असावा व किमान तीन वर्षांपासून कार्यरत असावा.
२. संबंधित उद्योगाने ‘रॅम्प’ कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतलेला असावा. यामध्ये आरबीएसएमएएस (Raising & Business Support Measures), क्षमता विकास (Capacity Building), एव्हीडीपी (Advanced Vendor Development Programme) तसेच कौशल्य विकास (Skill Development) आदी योजनांचा समावेश आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पात्र सूक्ष्म व लघुउद्योजकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत मोठ्या संख्येने नोंदणी करून आपले नामांकन सादर करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने करण्यात आले आहे.




