उद्धव साहेब, घाबरू नका; ही वेळही निघून जाईल : भास्कर जाधव

चिपळूण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात सुरू असलेल्या पक्षफुटीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आमदार भास्कर जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धीर देत कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक संदेश दिला. “घाबरून जाऊ नका, ही वेळदेखील निघून जाईल. जे होत आहे ते होऊ द्या, जे होणार आहे ते होणारच आहे. मात्र हे दिवस संपवण्यासाठी संघटनात्मक कार्यक्रम हाती घ्यावे लागतील,” असे जाधव यांनी म्हटले.

पक्षांतर आणि पक्षफोडीच्या राजकारणावर टीका करताना जाधव म्हणाले की, “काँग्रेसने कधीही पक्ष तोडण्याचे किंवा संपवण्याचे राजकारण केले नाही. देशात फक्त आम्हीच राहावे, या हेतूने काँग्रेसने कोणताही पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला नाही.”

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे कोणत्या नेत्याने कोणते पत्र दिले, हा विषय माझ्यासाठी गौण असल्याचे सांगत त्यांनी पक्षांतरबंदी कायद्यावरही भाष्य केले. “सरकारने पक्षांतरबंदी कायदाच रद्द करून टाकावा, मग देशात काय घडते ते सर्वांना दिसेल,” असे आव्हान त्यांनी दिले.

पक्षफुटीच्या चर्चांवर बोलताना जाधव यांनी संबंधित नेत्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. “ज्यांच्या नावाने पक्षफुटीच्या चर्चा सुरू आहेत, त्यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगली पाहिजे. पक्ष फोडून तुमच्या पक्षाची सूज वाढत असेल, पण समाजातील तुमच्याबद्दलचा आदर मात्र रसातळाला जात आहे,” असे ते म्हणाले.

पक्षातील गळती रोखण्यात अपयश आले असल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. “पंधरा वर्षे ममता बॅनर्जी यांनी ज्यांना विविध पदे दिली, ते नेते पंधरा दिवसही टिकले नाहीत. त्यामुळे गळती रोखण्यात अपयश आले असे म्हणता येणार नाही,” असे त्यांनी नमूद केले.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांवर भाष्य करताना जाधव म्हणाले, “पक्ष सोडून जाणारा एकही लोकप्रतिनिधी भाजपची विचारधारा किंवा नेतृत्व मान्य असल्यामुळे जात असल्याचे सांगत नाही. कोणीही विचारधारा स्वीकारून पक्ष सोडत नाही. अनेकजण छळ, दबाव किंवा चौकशांच्या त्रासाला कंटाळून पक्षांतर करत आहेत.”

भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर पुन्हा एकदा चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button