
उच्च सुरक्षा नंबर प्लेटसाठी आजचा शेवटचा दिवस, नियम न पाळणाऱ्या वाहनांवर उद्यापासून कठोर कारवाई
सन २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक असून, ही प्लेट बसवण्यासाठी मंगळवार, ३० जूनपर्यंतची अंतिम मुदत आहे. या मुदतीत नंबर प्लेट बसवण्याचा नियम न पाळणाऱ्या गाड्यांवर १ जुलैपासून मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.केंद्र सरकारने २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी विशेष सुरक्षित वाहन नंबर प्लेट बसविण्याच्या सूचना वर्षभरापूर्वी दिल्या होत्या. केंद्राच्या सूचनेनंतर राज्यातील परिवहन विभागाने सर्व वाहनांना ‘एचएसआरपी’ बसवणे बंधनकारक केले. मात्र अद्याप अनेक वाहनधारकांनी उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवली नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच अनुषंगाने परिवहन विभागाने कठोर कारवाईचे पाऊल उचलण्याची तयारी केली आहे.
उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याची ३० जूनची डेडलाइन न पाळणाऱ्या वाहनांवर १ जुलैपासून मोटार वाहन कायद्यांतर्गत कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनीही त्यांच्या वाहनांवर ३० जूनपूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवाव्यात, असे आवाहन परिवहन विभागाचे सहआयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.
अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनांना तात्पुरता दिलासा उच्च सुरक्षा नंबर प्लेटची अट वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी लागू नसेल. तसेच ३० जूनपर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अधिकृत अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना १ जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा मिळणार आहे.




