आंबा घाटातील लूटप्रकरणातील आरोपींना दिलासा नाही; सर्वांचे जामीन अर्ज नामंजूर

रत्नागिरी | प्रतिनिधी

रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट परिसरात वाहनचालकाला अडवून मारहाण, धमकावणे आणि रोकड लुटल्याच्या गाजलेल्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. अतिरिक्त सत्र न्यायालय, रत्नागिरी यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळून लावत गुन्ह्याचे गांभीर्य अधोरेखित केले आहे.

देवरुख पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्यात जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकाला आंबा घाट मार्गावर अडवून त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार, आरोपींनी चाकूचा धाक दाखवत वाहनचालकाकडे पैशांची मागणी केली आणि वाहनातील २५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने घेतली. तसेच त्याला धमकावत काही अंतरापर्यंत नेल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर देवरुख पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन करून व्यापक तपास सुरू केला. तपासादरम्यान या प्रकरणात नऊ जणांचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यापैकी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

या प्रकरणातील अटक आरोपींनी स्वतंत्रपणे जामीनासाठी अर्ज दाखल केले होते. मात्र न्यायालयाने तपासातील कागदपत्रे, उपलब्ध पुरावे आणि गुन्ह्याचे स्वरूप विचारात घेत आरोपींविरोधात प्रथमदर्शनी पुरेसा पुरावा असल्याचे नमूद केले. शस्त्राचा वापर, वाहनचालकाला धमकावणे, कथित लूटमार आणि तपास अद्याप सुरू असल्याच्या बाबी गंभीर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

तसेच या गुन्ह्यातील एक आरोपी अद्याप फरार असल्याने तपास अपूर्ण असल्याचे निरीक्षण नोंदवत, सध्याच्या टप्प्यावर आरोपींना जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. परिणामी सर्व आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले.

दरम्यान, एका आरोपीबाबत तपासादरम्यान त्याचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याचा दावा बचाव पक्षाने केला असून त्याचे नाव चुकीने समाविष्ट झाल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. मात्र या संदर्भातील अंतिम स्थिती पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे.

या निर्णयामुळे आंबा घाटातील लूटप्रकरणाच्या तपासाला आणखी बळ मिळाल्याचे मानले जात असून पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button